आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पण भाजप ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर, ४ मे (वार्ता.) – ओबीसींच्या आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे; मात्र आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ओबीसींना २७ टक्के आरक्षण देऊन या समाजाला न्याय देईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

१. काही काळापूर्वी ६ जिल्हा परिषदांच्या ओबीसी आरक्षित जागा रहित होऊन पोटनिवडणुका झाल्या असता भाजपने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते.

२. मुसलमान समाजातील लोक समजूतदारपणे स्वतःहून मशिदीवरील भोंगे काढण्यास सिद्ध असतांना महाविकास आघाडी सरकार मात्र त्यांना भोंग्यांसाठी अनुमती घेण्याचा आग्रह करत आहे. अशा प्रकारे वर्षभरासाठी कायमची अनुमती देता येत नाही, तरीही पोलीस आग्रह धरत आहेत. आघाडी सरकारच्या मुसलमान तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे आणि मुसलमानांची दीर्घकालीन हानी होत आहे.

३. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योग्य सूत्रे मांडली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी त्यांची मागणी आहे. मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याच्या त्यांच्या चेतावणीला सरकारकडून मिळणार्‍या प्रतिक्रियेमुळे दोन समुदायांना वेगळा न्याय लावला जात आहे.

हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंद होणे हा काय प्रकार ? – चंद्रकांत पाटील

(सौजन्य : TV9 Marathi)  

हनुमान चालिसा म्हटली की, राजद्रोहाचा गुन्हा नोंद होणे हा काय प्रकार आहे ? श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनात सहस्रोंनी बलीदान केले, लक्षावधी लोकांनी सत्याग्रह केला; पण हिंदू समाज थांबला नाही, याचा सरकारने विसर पडू देऊ नये, असे या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.