‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या वतीने ‘गोवा फाइल्स’ खुल्या !
पणजी, ३ मे (वार्ता.) – ‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या आजच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर या कार्यक्रमाला विरोध चालू झाला. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींमधून अजान देऊन ध्वनीप्रदूषण केले जाते; परंतु प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढता येत नाही. धार्मिक सलोखा अबाधित राखण्याचे दायित्व केवळ हिंदूंचेच आहे का ? गोव्यात ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून झालेल्या अत्याचारांविषयी ‘गोवा फाइल्स’ सिद्ध होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली. जो न्याय काश्मीरमधील हिंदूंना मिळतो, तोच न्याय गोव्यातील हिंदूंना का मिळू नये ? गोव्याच्या शेजारी असलेल्या कारवार, गोकर्ण आदी भागांत शेकडो वर्षे जुनी मंदिरे आहेत; परंतु गोव्यात अशी स्थिती नाही; कारण पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे नष्ट केली, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले. ‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या वतीने गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अनन्वित अत्याचार अन् मोठा वंशसंहार यांची माहिती देणाऱ्या ‘गोवा फाइल्स’ ३ मे या दिवशी सायंकाळी पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात भगवान श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या. या वेळी श्री. रमेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ३ ते २२ मे अशा २० दिवसांच्या एका जागृती मोहिमेचाही या वेळी शुभारंभ करण्यात आला.
‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या ‘फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ (गोव्याचा साहेब) होऊ शकत नाही’, या विधानाला काही ख्रिस्ती नेत्यांनी विरोध केला होता. या विधानावरून प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात गोव्यात २ ठिकाणी पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या. या विरोधाला न जुमानता ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ३ मे या दिवशीचा कार्यक्रम होणारच, असे घोषित केले होते.
त्यानंतर ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चा कार्यक्रम आणि प्रा. सुभाष वेलिंगकर यांना गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी अन् हिंदुत्वनिष्ठ यांनी पत्रकार परिषद घेऊन अथवा सामाजिक माध्यमातून ‘व्हिडिओ’ प्रसारित करून जाहीर पाठिंबा दर्शवला होता. कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला व्यासपिठावर प्रा. सुभाष वेलिंगकर, डॉ. सूरज काणेकर, ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी, राज्य संयोजक आणि सुकाणू समितीचे सदस्य प्रा. प्रवीण नेसवणकर, श्री. नितीन फळदेसाई, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर आदींची उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अखेर ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे राज्य संयोजक आणि सुकाणू समितीचे सदस्य प्रा. प्रवीण नेसवणकर यांनी मांडलेले विविध ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. डॉ. सूरज काणेकर यांनी अखेर आगामी कार्यक्रमांविषयी उपस्थितांना अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी, सूत्रसंचालन ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे श्री. नितीन फळदेसाई यांनी, उपस्थित मान्यवरांचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी, तर आभारप्रदर्शन सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले.
हिंदूंसाठी आत्मीयतेचा विषय ! – प्रा. सुभाष वेलिंगकर‘हिंदु रक्षा महाआघाडी’ संघटनेच्या वतीने ‘गोवा फाइल्स’ खुल्या करण्याचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जाऊ लागला आहे. हिंदूंसाठी हा एक आत्मीयतेचा विषय बनला आहे. हिंदु रक्षा महाआघाडी’चा हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी माझ्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, तरीही परमेश्वराचे अधिष्ठान असल्याने हा कार्यक्रम होऊ शकला. विरोध करणारे ‘गोवा फाइल्स’वर बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मला कह्यात घेण्याची मागणी करण्यात आली. आम्ही ख्रिस्त्यांच्या विरोधात नाही, तसेच हिंदु समाज हा कधीच दंगल करत नाही. गोव्यातील ख्रिस्ती आणि आमचा ‘डी.एन्.ए.’ एकच आहे. फ्रान्सिस झेवियर हे ख्रिस्त्यांचे संत असू शकतात आणि त्याला आमचा आक्षेप नाही; परंतु आमच्या पूर्वजांवर ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून अनन्वित छळ करणारा आणि पोर्तुगिजांच्या रक्षणासाठी काम करणारा याला आम्ही ‘गोंयचो सायब’ असे कसे संबोधू शकतो ? राष्ट्रप्रेम सर्वात महत्त्वाचे आहे. गोव्यात हिंदू आणि ख्रिस्ती यांना एकत्र येण्यास काही लोक विरोध करतात. अशा लोकांना गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण करणे’ असे म्हटले आहे. गोव्यात आज ‘पोर्तुगीज कसे चांगले होते ?’, असे सांगण्याची काही जणांमध्ये जणू स्पर्धाच चालू आहे.’’ |