श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. शिकण्याची प्रक्रिया

१ अ. शिकण्यातून सर्वांगीण विकास होऊन चिरंतन आनंदाकडे वाटचाल होणे : ‘शिकण्याची प्रक्रिया, म्हणजे काय ?’, ते शिकता आले पाहिजे. ज्या शिकण्यामधून आपला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर सर्वांगीण विकास होऊन आपली वाटचाल चिरंतन आनंदाकडे होते, तेच खरे शिकणे आहे.

१ आ. आपल्या मनाला वाटेल, ते शिकण्यापेक्षा ‘आपल्याला जे सांगितले आहे आणि ज्या शिक्षणाची आपल्याला वर्तमानात आवश्यकता आहे’, ते शिकणे हे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगले असते.

१ इ. ‘स्वतःच्या मनाप्रमाणे वागून शिकवणाऱ्यालाच शिकवायचा प्रयत्न करणे’, हे अहंचे लक्षण आहे.

१ ई. नेहमी शिकण्याच्या भूमिकेतूनच शिकावे. त्या वेळी मनात कोणताही पूर्वग्रह ठेवू नये. आपले शिकणेसुद्धा निर्मळ असावे.

२. शिक्षकांविषयी भाव ठेवून गुरुकुलाची निर्मिती करा !

अ. शिकवणाऱ्यांच्या गुणांकडे जिज्ञासूपणाने लक्ष द्यावे, म्हणजे त्यांच्याविषयी आपल्या मनात भाव निर्माण होतो. शिक्षकांविषयीच मनात विकल्प असेल, तर ती प्रक्रिया शिकण्याची न होता, प्रतिक्रिया निर्मितीची बनते.

आ. प्रतिक्रियांमुळे वातावरण दूषित बनते. शिक्षकांविषयी भाव ठेवला, तर कुठल्याही ठिकाणी गुरुकुलच निर्माण होते. अशा गुरुकुलातून घडणारी पिढी राष्ट्रालाही लीलया घडवते.

इ. आता अंतर्मनच गुरुकुल बनलेल्या अशा अनेक लहान-सहान चैतन्यशाळांची आवश्यकता आहे. बाहेरून मोठमोठी बांधकामे उभी करण्याची आवश्यकता नाही, तर आपल्या मनाची उभारणीच गुरुकुलासारखी करा आणि मग पहा त्यातून किती उत्तम शिष्य बाहेर पडतात ते !

३. सहसाधकांवर मातृतुल्य प्रेम करून त्यांच्याकडून आईच्या मायेने शिकायला हवे !

साधनेत सहसाधकांशी आपली एवढी जवळीक हवी की, आई शिकवते, त्या वेळच्या तिच्या मायेने प्रत्येकाशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. आईला कधीही कोणतेही मूल ‘आता तुला वेळ आहे का ? मी आता तुझ्याशी बोलू का ?’, असे विचारत नाही. ते कसलाही विचार न करता अगदी पळत जाऊन थेट तिला मिठी मारते, तिला बिलगते आणि तिचे काहीही ऐकून न घेता, आधीच तिला मनातील सर्व गोष्टी भराभरा सांगून मोकळे होते. मग आईसुद्धा तेवढ्याच मायेने ते ऐकते आणि ‘माझे बाळ किती गोड बोलते !’, असे म्हणून त्याची एक पापी घेऊन मोकळी होते. बाळाला एवढेच पुरेसे असते. आईच्या स्पर्शातील प्रेम बाळाला आयुष्यात पुष्कळ काही देऊन जाते. जड शब्दांच्या संवादापेक्षा बाळाचा आईवर असलेला विश्वासच त्याला आयुष्यात मोठे करतो. असाच विश्वास आपण आपल्या सहसाधकावर ठेवून त्याच्याकडून आई शिकवते, त्या वेळच्या तिच्या मायेने शिकायला हवे. या निर्मळ नात्यातूनच ज्ञानाचे असंख्य शब्द बाहेर पडतात. हे शब्दच तुम्हाला ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेतात.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२०)