देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे
नामजपाचे सतत स्मरण व्हावे, यासाठी आपल्या दृष्टीसमोर देवतेच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे उपयुक्त ठरते. सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात. बऱ्याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे उतरते असते, म्हणजेच भूमीच्या पातळीशी समांतर नसते. इमारतींमधील खोल्यांच्या संदर्भात कौलारू घरांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. यामुळे वास्तूत अयोग्य स्पंदने सिद्ध होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या खोलीतील बाजूच्या भिंतींवर अशा प्रकारे एका रेषेत लावाव्यात की, त्या नामपट्ट्यांमुळे भूमीच्या पातळीशी समांतर असे सूक्ष्मातील छत निर्माण होईल. नामपट्ट्यांतून निघणाऱ्या चैतन्यलहरी अधिक प्रमाणात भूमीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे हे सूक्ष्म-छत सिद्ध होते. यामुळे वास्तूत चांगली स्पंदने निर्माण होतात आणि वास्तूचे रक्षण होते. पुढे दिलेल्या आकृत्यांवरून हे अधिक लक्षात येईल.
वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे शुद्धी करणे होय. वास्तूत कोणताही दोष राहू नये म्हणून हल्ली बांधकाम व्यावसायिक अन् ग्राहक वास्तूशास्त्राचा गांभीर्याने विचार करत आहेत; मात्र या क्षेत्रातही भ्रष्ट व्यक्तींनी शिरकाव केल्याने वास्तूशुद्धीसाठी अनावश्यक खर्चिक विधी करणे, वास्तूच्या रचनेत फेरबदल करणे, असे गैरप्रकार वाढत आहेत. हे टाळण्यासाठी वास्तूदोष दूर करण्याच्या इतर प्रचलित पद्धतींपेक्षा अल्प व्ययाच्या आणि सुलभ पद्धती पुढे दिल्या आहेत.
घराच्या भिंती पूर्व, पश्चिम आदी मुख्य दिशांना समांतर नसून आग्नेय, नैऋत्यादी उपदिशांना समांतर असल्यास दोन भिंतींच्या मध्यभागी दोरी लावून नामपट्ट्यांद्वारे वास्तू-छत सिद्ध करावे.
कौलारू घरांप्रमाणे बऱ्याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे भूमीशी समांतर नसल्याने वास्तूत अयोग्य स्पंदने निर्माण होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या प्रत्येक खोलीच्या भिंतींवर एका रेषेत लावाव्यात. यामुळे नामपट्ट्यांतून निघणाऱ्या चैतन्यलहरी भूमीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे वास्तूत सूक्ष्म-छत निर्माण होऊन वास्तूचे रक्षण होते. नामपट्ट्या लावतांना दोन पट्ट्यांमधील अंतर १ मीटरपेक्षा अधिक असू नये.
वास्तूशुद्धीच्या काही सुलभ पद्धती
१. अडगळ काढणे
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत सुमारे ४७ टक्के वस्तू अनावश्यक असतात. या अनावश्यक वस्तू तेथून बाहेर काढाव्यात आणि उर्वरित वस्तूंची योग्य रचना करावी.
२. विभूती फुंकणे
तीर्थक्षेत्राची अथवा यज्ञाची विभूती वास्तूतून बाहेरच्या दिशेने फुंकरावी. विभूतीतील सात्त्विकतेचा वाईट शक्तींना त्रास होतो आणि त्यामुळे त्या दूर पळतात. वास्तूत विभूतीयुक्त तीर्थ शिंपडल्यास त्याचा परिणाम अधिक काळ टिकतो.
३. गोमूत्र शिंपडणे
वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडल्याने वास्तूतील वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण होते. गोमूत्राचे धार्मिक विधींमध्ये आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच गोमूत्र हे आरोग्यदायी अन् आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असते. गोमूत्र न मिळाल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालून ते पाणी शिंपडावे. गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी शिंपडतांना ते प्रदक्षिणेच्या उलट दिशेने शिंपडावे.
सर्वसाधारणतः वास्तूशुद्धीची कृती (उदा. गोमूत्र शिंपडणे) वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) भिंतींच्या कडेकडेने फिरत करावी !
वास्तूतील त्रासदायक स्पंदने नष्ट करणे, हा वास्तूशुद्धीचा उद्देश असतो. याचाच अर्थ, वास्तूशुद्धी हे एक प्रकारचे मारक स्वरूपाचे कार्य आहे. हे कार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी वास्तूत गोमूत्र शिंपडणे, कडुलिंबाच्या पानांची धुरी दाखवणे, धूप वा उदबत्ती फिरवणे, विभूती फुंकरणे यांसारख्या वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने), तसेच भिंतींच्या कडेकडेने फिरत कराव्यात.
वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढणे
वास्तूशुद्धीच्या कृती उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणातील ईश्वराची मारक शक्ती जागृत होते. ही शक्ती वायूमंडलातील रज-तमयुक्त स्पंदनांना त्वरित नष्ट करू शकते; कारण मारक स्पंदनांची फिरण्याची गती ही उजवीकडून डावीकडे या मार्गानेच असते आणि नेमक्या या गतीचा उपयोग करून त्याच पद्धतीने वास्तूशुद्धीची कृती केल्यामुळे वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढते.
४. धूप करणे
वास्तूत धूप किंवा सात्त्विक उदबत्ती लावावी किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी दाखवावी. काही चांगल्या शक्ती या वायुरूप आणि सुगंधाने आकर्षित होणाऱ्या असतात. धूप केल्याने या चांगल्या शक्ती वास्तूत आकर्षित होतात अन् त्यामुळे वास्तू सात्त्विक बनते. तसेच धूप केल्याने काही वाईट शक्ती वास्तूतून दूर जातात. धुपातून प्रक्षेपित होणाऱ्या रजोगुणी, तसेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींमुळे वास्तूतील कनिष्ठ देवतांच्या लहरी कार्यरत होण्यास साहाय्य होते. प्रथम कनिष्ठ देवतांना संतुष्ट केल्यामुळे वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर नियंत्रण येण्यास साहाय्य होते.
५. नामजप करणे
वास्तूच्या शुद्धीसाठी आपल्या उपास्यदेवतेला आणि वास्तूदेवतेला प्रार्थना करून नामजप करावा. स्थूलातील वरील ४ उपायांपेक्षा नामजप अधिक सूक्ष्म, म्हणजेच अधिक प्रभावी आहे.
(संदर्भ : sanatan.org)
दुचाकी वाहनास नामपट्ट्या लावण्याची पद्धत
दुचाकीच्या पुढच्या बाजूला ‘गणपति’ आणि मागच्या बाजूला ‘श्रीकृष्ण’ या देवतांच्या नामपट्ट्या लावाव्यात.
चारचाकी वाहनातील नामपट्ट्यांची रचना
वाहनशुद्धीसाठी वाहनात देवतांच्या नामपट्ट्या लावतांना त्यांची रचना पुढीलप्रमाणे करावी.
१. चालकाच्या आसनासमोर – श्रीकृष्ण
२. चालकाच्या बाजूच्या आसनासमोर – गणपति
३. चालकाच्या मागील बाजूस डावीकडील खिडकीच्या वर – श्रीराम
४. चालकाच्या मागील बाजूस उजवीकडील खिडकीच्या वर – दत्त
५. गाडीच्या मागील बाजूस डावीकडे – देवी (दुर्गा, अंबादेवी, भवानीदेवी, रेणुकादेवी इत्यादी)
६. गाडीच्या मागील बाजूस मध्यभागी – शिव
७. गाडीच्या मागील बाजूस उजवीकडे – मारुति
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |