‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’ करायचे आहे ! – अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई – मी ‘बॉलिवूड’मधील ३ गोष्टी पालटू इच्छितो. प्रथम मी ‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’, असे ठेवीन. दुसरे म्हणजे चित्रपटाच्या ‘सेट’वर रोमन लिपीमध्ये कलाकारांना संहिता (स्क्रिप्ट) दिली जात, मी ती संहिता देवनागरी लिपीमध्ये मागतो. तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटांच्या ‘सेट’वर हिंदी भाषेतच बोलले पाहिजे. चित्रपट हिंदी; पण दिग्दर्शक आणि साहाय्यक दिग्दर्शक इंग्रजी भाषेतच बोलतात, असे विधान अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी ‘इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह २०२२’ या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमामध्ये नवाजुद्दीन यांना ‘बॉलिवूडमध्ये कोणते पालट घडले पाहिजेत’ असे तुला वाटते ?’, असा प्रश्‍न विचारण्यात आला असता त्यांनी वरील उत्तर दिले.

१. या कार्यक्रमाच्या वेळी नवाजुद्दीन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची सर्वाधिक चांगली गोष्ट म्हणजे सगळेच एकमेकांशी मातृभाषेत संवाद साधतात. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक, रंगभूषाकार सगळेच जण त्यांच्या भाषेत एकमेकांशी संवाद साधतात.

२. नवाजुद्दीन पुढे म्हणाले की, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण चालू असतांना दिग्दर्शक वेगळ्याच पद्धतीने बोलतात, तर त्यांचे साहाय्यक काही वेगळेच चित्र तयार करत असतात आणि या गोंधळामध्ये कलाकार अगदी एकटा उभा असतो. रंगभूमीवरील एखादा कलाकार, ज्याचे इंग्रजी भाषेवर फारसे प्रभुत्व नसते त्याला ‘चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक काय बोलत आहे ?’, हेच कळत नाही.