पाश्चात्त्य देशांनी दरोडेखोरांसारखे येऊन भारताला लुटले ! – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये दरोडेखोरांसारखे येऊन त्यांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले. एका आर्थिक अभ्यासामध्ये लावण्यात आलेल्या अनुमानानुसार ब्रिटिशांनी आजच्या मूल्यांकनानुसार अनुमाने ४५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स (४५ लाख कोटी डॉलर्स) भारतातून लुटून नेले. यावरून आपल्याला त्या २०० वर्षांमध्ये वास्तवात काय घडले, याचा अंदाज येऊ शकतो, अशा शब्दांत भारताचे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांना सुनावले.

सध्या परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या मुत्सद्देगिरीची देशभर चर्चा होत आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये अटलांटिक कौन्सिलच्या ‘साऊथ एशिया सेंटर’ने परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्यासमवेत एका ‘राऊंड टेबल कन्व्हर्सेशन’चे आयोजन केले होते. त्यात पाश्चात्त्य नागरिकांसमोर बोलतांना जयशंकर यांनी वरील प्रतिपादन केले. त्याविषयीची एक जुनी चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे.

यात परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले की,

१. आपल्यातील अनेकांनी दुसऱ्या देशात ‘अवमानाचे शतक’ हा शब्द ऐकला असेल. वास्तविक भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्त्य देश दरोडेखोरांसारखे भारतात आले आणि त्यांनी अनुमाने १९० वर्षे राज्य केले.

२. पाश्चात्त्य देशांना भारताची जेवढी आवश्यकता आहे, तेवढीच भारतालाही त्यांची आवश्यकता आहे. या संबंधांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

पाश्चात्त्य देशांना खडे बोल सुनावणाऱ्या केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांचे अभिनंदन !