|
मुंबई, २५ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह देशभर राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे मंदिरांत साकडे घालून देवतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करणे. या अनुषंगाने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले. श्री महालक्ष्मी मंदिर येथील श्री. विरकरगुरुजी यांनी उपस्थित सर्वांकडून हे साकडे म्हणवून घेतले. ‘भारतासह पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन होऊ दे. त्यासाठी कार्यरत सर्वांचे आयुरारोग्य उत्तम राहून त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे. हिंदु धर्मावरील आघात निष्प्रभ होऊ दे आणि जागतिक अशांतता अन् युद्धजन्य स्थितीत जगभरातील ईश्वरभक्तांचे रक्षण होऊ दे’, यासाठी देवीच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करून देवीला साकडे घालण्यात आले.
‘वज्रदल’चे अध्यक्ष श्री. दिनेश कोंडविलकर, ‘भगवा गार्ड’चे पदाधिकारी श्री. अवधूत पेडणेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रसाद संकपाळ, भाजपचे विधानसभा सचिव (वरळी) श्री. संघटन शर्मा, ‘युवा मराठा’चे संपादक श्री. विजय पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, धर्मप्रेमी श्री. विवेक राजपूत आणि श्री. मनु परमार यांच्यासह सनातन संस्थेचे साधक, देवीच्या दर्शनासाठी आलेले समस्त भाविक या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाला श्री महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक श्री. शरदचंद्र पाध्ये यांचे उत्तम सहकार्य लाभले.
मुंबई आणि नवी मुंबई येथील ८० मंदिरांत साकडे, २ सहस्र ५०० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग
मुंबई आणि नवी मुंबईत एकूण ८० मंदिरांत साकडे घालण्यात आले. यामध्ये २ सहस्र ५०० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला. मुंबईतील दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूझ, माहीम, दादर, प्रभादेवी, वरळी, गिरगाव, महालक्ष्मी, परळ, वडाळा, शीव, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड येथील मंदिरांत साकडे घालण्यात आले, तर नवी मुंबईतील सानपाडा, नेरूळ, सी.बी.डी. बेलापूर, खारघर, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील मंदिरांत साकडे घालण्यात आले. या सर्वांनी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत पुढील मासात मुंबई येथे होणाऱ्या हिंदु एकता दिंडीमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.
ठाणे जिल्ह्यात ४२ मंदिरांत साकडे : १ सहस्र ७५० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग
ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी, भाईंदर आणि मीरा रोड येथील विविध मंदिरांत साकडे घालण्यात आले. यामध्ये १ सहस्र ७५० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला. काही ठिकाणी साकडे घालून सामूहिक प्रार्थना केल्यानंतर भाविकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या.
रायगड जिल्ह्यात ४९ मंदिरांत साकडे, २ सहस्र ५०० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी यांचा सहभाग
रायगड जिल्ह्यात नागोठणे, रोहा, अलिबाग, पेण, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, शिरढोण येथील ४९ मंदिरात साकडे घालण्यात आले. यांमध्ये २ सहस्र ५०० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला. अनेक ठिकाणी साकडे घातल्यानंतर भाविक आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत चालू असलेल्या पुढील उपक्रमांत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यात १४ मंदिरांत साकडे, ५५० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग
पालघर जिल्ह्यात डहाणू, बोईसर, वसई, नालासोपारा, विरार येथील १४ मंदिरांत साकडे घालण्यात आले. यामध्ये ५५० हून अधिक भाविक आणि धर्मप्रेमी यांनी यात सहभाग घेतला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील विविध गावांमधील भाविकही सहभागी झाले होते.
‘मंदिरात साकडे घालणे’ या उपक्रमात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग अन् ठकठिकाणचे मंदिर विश्वस्त, मंदिर पुजारी यांचे उत्तम सहकार्य !श्रीरामनवमीपासून चालू झालेल्या ‘मंदिरात साकडे घालणे’ या उपक्रमात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ या सर्वांनी या उपक्रमाचे निमंत्रण सामाजिक प्रसारमाध्यमे, फलक यांद्वारे देणे आदी सेवांमध्ये सहभाग घेतला. तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष मंदिरात साकडे घालणे चालू असतांनाही विविध सेवांमध्ये अनेकांनी सेवा केली. ठिकठिकाणचे मंदिर विश्वस्त आणि मंदिर पुजारी यांच्यासह भाविकांनी या उपक्रमाला उत्तम सहकार्य केल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील सहस्रो जिज्ञासूंना या उपक्रमात सहभागी होता आले. |