संतसेवा भावपूर्ण करणाऱ्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगला पुराणिक (वय ७० वर्षे) आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असणाऱ्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८५ वर्षे) !
रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करणाऱ्या प्रेमळ, उत्साही आणि शरणागतभाव असलेल्या श्रीमती मंगला पुराणिक यांनी ६२ टक्के, तर विविध ओव्यांची रचना करून परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव व्यक्त करणाऱ्या अन् कृतज्ञतेने सदैव गुरुचरणी लीन असणाऱ्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या आई) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही आनंदवार्ता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी १५ मार्च २०२२ या दिवशी ‘गुरुगाथा’ सत्संगात केली. ही आनंदवार्ता ऐकून उपस्थितांची भावजागृती झाली. या वेळी श्रीमती पुराणिक आणि श्रीमती चौधरी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. चौधरीआजींची कन्या पू. (सौ.) संगीता जाधव, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जावई श्री. विष्णुपंत जाधव, मुलगे श्री. अमर चौधरी, श्री. प्रताप चौधरी, मुलगी सौ. शैलजा कवडे आणि आजींची नातसून सौ. कीर्ती प्रतीक जाधव हे या सत्संगाला ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे उपस्थित होत्या.
अशी झाली आनंदवार्ता घोषित
आपत्काळाची वाढती तीव्रता, तसेच आपत्काळाच्या माध्यमातून गुरूंच्या कृपेने साधकांच्या साधनेला लाभलेली अनुकूलता आणि जलद आध्यात्मिक उन्नतीची संधी यांचा विचार करता साधनेचे प्रयत्न पुष्कळ गतीने वाढवणे अपेक्षित आहे. या दृष्टीने साधनेची दिशा मिळावी, यासाठी ‘गुरुगाथा’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात दैवी युवा साधिका कु. विशाखा चौधरी, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रोहिणी भुकन, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानु पुराणिक (श्रीमती मंगला पुराणिक यांचा मुलगा) या साधकांनी ‘संतसहवासाद्वारे दिव्य गुरुगाथा अनुभवण्याची संधी कशी मिळाली ?’ याविषयी त्यांचे अनुभव सांगितले. ‘श्रीमती मंगला पुराणिककाकू या संतांसाठी स्वयंपाकाची सेवा करतांना काय भाव ठेवतात ?’ हे त्यांनी सांगितले. या वेळी ‘ही सेवा करतांना श्रीमती मंगला पुराणिककाकूंनी परिपूर्णता, सेवेशी एकरूपता आणि प्रेमभाव आदी गुण कसे आचरणात आणले ?’ हे त्यांच्यासह सेवा करणाऱ्या काही साधिकांनी सांगितले. यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पुढील काव्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे गुपित उलगडले.
‘प्रेमळ अन् उत्साही । असती तेजोमय मूर्ती ।।
साधनेचे तेज झळके । जयांच्या मुखावरी ।।
प्रतीक्षा जन्मोजन्मीची । समाप्त होऊनी ।।
लीन झाल्या श्रीगुरुचरणी । शरणागत होऊनी ।।
६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कृतज्ञतापुष्प
श्रीमती पुराणिककाकू वहाती गुरुचरणांवरी ।।’
या काव्यपंक्ती सांगून श्रीमती मंगला पुराणिककाकू (वय ७० वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले. ही आनंदवार्ता कळताच श्रीमती पुराणिककाकूंसह त्यांचे कुटुंबीय अन् उपस्थित साधक भावविभोर झाले.
या आनंदमय वातावरणात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगाला उपस्थित असलेल्या श्रीमती मंदाकिनी चौधरीआजींना परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि रामनाथी आश्रम यांच्याविषयी काही काही ओव्या म्हणायला सांगितल्या. या ओव्या चौधरीआजींना आतून स्फुरतात. त्या म्हणत असलेल्या ओव्या ऐकून उपस्थित साधक ते भावविश्व अनुभवू लागले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी पुढील काव्याद्वारे श्रीमती चौधरीआजी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले.
‘कृपाळू गुरुमाऊली साधकांवरी अपार कृपा करी ।
साधनापथावरी अखंड आमुचा हात धरी ।
ऋण तयांचे असे अपार आम्हा साधकांवरी ।
ऋणी तयांच्या चरणी आम्ही जन्मजन्मांतरी ।।
अपार भाव अनुभवूनी अंतरी ।
रचती जनाईसम ओव्या गुरुदेवांवरी ।
भक्तीद्वारे करूनी मात मायामोहावरी ।
कृतज्ञतेने लीन होती श्रीगुरुचरणांवरी ।’
हे काव्य वाचून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती चौधरीआजी या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. हे गुपित उलगडल्यावर तर साधकांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आध्यात्मिक उन्नती झालेल्या साधिकांविषयी काढलेले गौरवोद्गार !
१. साधकांनी पुराणिककाकूंकडून ‘साधनेत अल्पसंतुष्टता नको’, हे शिकावे !
श्रीमती पुराणिककाकूंनी जे मनोगत व्यक्त केले, त्यातून सर्वांनी ‘साधनेत अल्पसंतुष्टता असू नये’, हे शिकले पाहिजे. काकूंनी सगुणातील गुरुसेवा केली नसली, तरी निर्गुण गुरुतत्त्व त्यांना आतून अखंड मार्गदर्शन करून घडवत आहे. गुरुतत्त्वाकडून साधनेचे ज्ञान मिळते. जो कृती करतो, त्याला देव भरभरून देतो. आपण शिकण्याच्या स्थितीत राहून निरंतर प्रयत्न केल्यास देव ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर पुढे पुढे घेऊन जातो. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आणि पुढच्या पुढच्या टप्प्याची अनुभूती घेणे, हेच अध्यात्म आहे.
२. श्रीमती चौधरीआजी यांच्यातील भावामुळे त्यांच्या ओव्या ऐकत रहाव्या वाटतात !
श्रीमती चौधरीआजी अखंड अनुसंधानात आणि सतत भावावस्थेत असतात. त्यांच्याकडे बघूनही भावजागृती होते. या वेळी रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांना संत, परात्पर गुरुदेव, भगवंत यांच्याविषयी ओव्या, लहान लहान काव्य असे सुचू लागले. रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती आजींचा पुष्कळ भाव असल्याने त्या म्हणत असलेल्या ओव्या ऐकत रहाव्याशा वाटतात. आजींनी कुटुंबातील सर्वांवर चांगले संस्कार करून साधनेचे महत्त्व बिंबवले आहे.
आईला ‘वैकुंठात राहून परात्पर गुरुदेवांच्या चरणी विलीन व्हावे’, असे वाटते ! – पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या कन्या)
१. श्रीमती चौधरी (आई) यांचा परात्पर गुरुदेव, आश्रम आणि आश्रमातील साधक यांच्याविषयी असलेला भोळाभाव
काही वर्षांपूर्वी आई परात्पर गुरुदेव, रामनाथी येथील सनातनचा आश्रम, साधक यांविषयी सर्वांना सांगायची. आता ती रामनाथी येथील आश्रमात सेवा करत आहे. तिला परात्पर गुरुदेवांच्या व्यतिरिक्त अन्य काही सुचत नाही. ती भ्रमणभाषवर बोलतांनाही परात्पर गुरुदेवांविषयीच बोलत असते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथातील प्रत्येक पानावरील गुरुदेवांचे छायाचित्र पाहून त्यांना पुष्कळ आळवायची. त्या माध्यमातून तिने पुष्कळ अनुसंधान साधले.
आई सतत भावावस्थेत असल्याने तिला ‘आश्रमातील साधक व्यक्ती नसून त्या देवता आहेत’, तसेच ‘आश्रमात रिद्धी-सिद्धि आहेत’, ‘आपण श्री लक्ष्मीनारायणाच्या दारात आहोत’, असे जाणवते. यासमवेत तिला ‘वैकुंठात राहून परात्पर गुरुदेवांच्या चरणी विलीन व्हावे’, असे वाटते.
२. आईने आयुष्यभर धर्माचरण करणे
आईने धर्माचरण कधीच सोडले नाही. आईचे काही चुकल्यास बाबा तिला रागवायचे; पण तिने कधी प्रत्युत्तर दिले नाही. तिने नेहमीच पतीला परमेश्वर मानले आणि त्याप्रमाणे आचरण केले. ती प्रतिदिन सकाळी उठल्यावर त्यांना नमस्कार करायची. तिने आयुष्यभर पुष्कळ कष्ट घेतले आहेत; पण देवाने ते प्रारब्ध आता संपवले आहे.
३. आईचा अन्य संप्रदायांविषयी असलेला आदरभाव !
आई पूर्वी एका संप्रदायानुसार साधना करायची. त्या संप्रदायानुसार तिची साधना चांगली चालू होती. सनातन संस्थेचे कार्य आणि साधना कळल्यानंतर एक दिवस तिला एका अनुभूतीमध्ये प.पू. भक्तराज महाराज दिसले. ती आता सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असली, तरी ती त्या संप्रदायाविषयी चांगलेच बोलते. तिचा असा भाव आहे की, त्या संप्रदायानुसार साधना केल्याने त्यांनीच मला येथे सोडले.
‘आयुष्याच्या अंतिम टप्प्याला असतांना देवाने त्याच्या चरणांशी आणले, यात आईने सार्थक मानले आणि त्यातच तिला सर्व मिळाले’, असे ती अनुभवत आहे.
देव माझ्यासाठी पुष्कळ करतो ! – श्रीमती मंदाकिनी चौधरीमी देवासाठी काही केलेले नाही, तरी देवाने माझ्यासाठी केवढे केले ! ही आनंदवार्ता ऐकून आनंद वाटला. साक्षात् श्रीलक्ष्मी मला साहाय्य करते. श्रीविष्णुचा वैकुंठ आणि रामनाथी येथील सनातनचा आश्रम यांत काही भेद नाही. हे मी क्षणोक्षणी अनुभवत असते. |
श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. विष्णुपंत जाधव (जावई) – श्रीमती चौधरीआजी अखंड भावावस्थेत असतात. त्या नियमितपणे कुलाचाराचे पालन करतात.
२. आजींची सर्वांनाच प्रेम देण्याची धडपड असते ! – श्री. प्रतीक जाधव (श्रीमती चौधरीआजींचा नातू)
आजी प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून सर्व आवरून झाल्यावर देवाची पूजा करतात आणि त्यानंतर सकाळी ७.१५ वाजताच त्या आश्रमात सेवेसाठी जाण्यास सिद्ध असतात. त्यांना शारीरिक त्रास जरी होत असला, तरी त्या सेवेसाठी आश्रमात जातातच. आजींना सर्वांविषयीच प्रीती असल्याने त्या प्रेम देण्यासाठी धडपड करत असतात.’’
३. आश्रमातील कार्यपद्धती पाळणे, हे आजींच्या वृत्तीतच आहे ! – सौ. कीर्ती जाधव (श्रीमती चौधरीआजींची नातसून)
आजींनी परात्पर गुरुदेवांवर आणि अन्य अनेक विषयांवर ओव्या रचल्या आहेत. त्यावरून असे वाटते की, त्यांचा मागील काही जन्मांपासून परात्पर गुरुदेवांविषयी भाव आहे. त्या नुकत्याच आश्रमात रहायला आल्या असूनही त्या आश्रमातील सर्व कार्यपद्धतींचे पालन कटाक्षाने करतात. आश्रमातील कार्यपद्धती पाळणे, हे आजींच्या वृत्तीतच आहे.
४. आजींमध्ये कृतज्ञताभाव आहे ! – सौ. अनन्या अक्षय पाटील (पू. (सौ.) संगीता जाधव यांची कन्या, आजींची नात)
लहानपणापासून आजीने मला सांभाळले आणि माझ्यावर संस्कार केले. आजीला स्वतःचे असे वेगळे राहणीमान नसून ती जिथे जाईल तिथे मिसळून जाते. तिला आवड-निवड काही नाही. ‘भगवंत आपल्याला देतो’, असा तिचा कृतज्ञताभाव असतो.
५. श्री. अक्षय पाटील (नातजावई) – २-३ दिवसांपासून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे जाणवत होते. आजींकडे बघून कायम आनंद जाणवतो.
संतांसाठी स्वयंपाक करण्याची सेवा करतांना मला ईश्वरी तत्त्व कार्य करत असल्याचे जाणवते ! – श्रीमती मंगला पुराणिकसंतांसाठी स्वयंपाक करण्याची सेवा करतांना मला ईश्वरी तत्त्व कार्य करत असल्याचे जाणवते. संत हे देवाचे सगुण रूप असल्याने तेच सेवेतील बारकावे सुचवतात आणि करवूनही घेतात. एक दिवस प्रार्थना करतांना माझ्याकडून प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांना आपोआप प्रार्थना झाली, ‘‘तुम्हीच माझ्याकडून भावपूर्ण सेवा करवून घ्या. प.प. श्रीधरस्वामी यांचे शिष्य प.पू. दास महाराज हे मारुतीचे अंशावतार आहेत, त्यांची सेवा करता येऊ दे.’’ त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याची संधी मिळाली. कधी कधी देवच माझ्याकडून प्रयत्न करवून घेतो, याची जाणीव होती. तो पुढे घेऊन जातो आणि प्रेम करतो, हे अनुभवता आले. मला शांत वाटले. जरी पातळी घोषित झाली असली, तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. (‘परात्पर गुरुदेवांचे जेवण हे बालकासारखे थोडेच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करतांना पुराणिककाकूंचा एखाद्या बालकाप्रती असतो, तसा भाव जागृत होतो. श्रीमती पुराणिककाकू संतांसाठी स्वयंपाक करत असतांना देवच त्यांच्यात भाव जागृत करत असतो’, असे या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.) |
श्रीमती मंगला पुराणिक यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. आईने स्वतःचे दोष स्वीकारून त्यावर मात करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले ! – श्री. भानु पुराणिक (श्रीमती मंगला पुराणिक यांचा मुलगा)
आईची यापूर्वी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली होती. त्यानंतर दोष वाढल्याने तिची आध्यात्मिक पातळी न्यून झाली. त्यानंतर आईने साधनेसाठी पुष्कळ कष्ट घेतले. व्यष्टी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले. स्वतःचे दोष स्वीकारून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सेवा करतांना येईल ती परिस्थिती स्वीकारून चिकाटीने प्रयत्न केले. त्यामुळे आईच्या तोंडवळ्यावर तेज दिसू लागले आहे. तिच्या आवाजातही मृदूता आली आहे.
२. सौ. आरती भानु पुराणिक (सून)
गेल्या काही मासांपासून आईंच्या (श्रीमती मंगला पुराणिक यांच्या) स्वभावात पालट जाणवतात. मी त्यांना माझ्या चुका सांगितल्यावर त्यावर त्या आधार देतात. त्या माझ्याकडे सून म्हणून न बघता साधक म्हणूनच पहातात. आईंच्या स्वतःच्या गरजा अत्यंत न्यून असून त्यांच्याकडे कपडेही आवश्यक तेवढ्याच संख्येने आहेत.
३. स्वतःची साधना होण्यासाठी आईने केलेला संघर्ष शिकण्यासारखा ! – सौ. विशाखा आठवले (श्रीमती मंगला पुराणिक यांची मोठी मुलगी)
आईची आध्यात्मिक पातळी घोषित होण्याच्या या क्षणाची वाट पहात होते. ती कुणात अडकलेली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरला गेलो होतो. त्या वेळी आईचा तोंडवळा कै. प.पू. (श्रीमती) शकुंतला पेठेआजी यांच्यासारखा जाणवला.