गोव्यात नव्या मोटर वाहन कायद्याच्या भीतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन ९० टक्के अल्प

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – नव्या मोटर वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास होणार्‍या दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने ‘अधिक रकमेचा दंड भरावा लागेल’, या भीतीने वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ९० टक्के न्यून झाले आहे. या कायद्याच्या कार्यवाहीनंतर शिरस्त्राण (हेल्मेट) न वापरणे, चारचाकी वाहनात पट्टा (सीटबेल्ट) न घालणे या नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार ९० टक्के न्यून झाल्याची माहिती वाहतूक अधिकार्‍यांनी दिली आहे.

पूर्वी शिरस्त्राण (हेल्मेट) न घातल्यास १०० रुपये दंड होता, तो आता १ सहस्र रुपये इतका झाला आहे. याविषयी एक वाहतूक अधिकारी म्हणाले, ‘‘जेव्हा या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही चालू झाली, त्या वेळी आरंभीचे काही दिवस दंडाची पुष्कळ रक्कम जमा झाली; परंतु आता ‘मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल’ या भीतीने वाहनचालक हेल्मेट आणि सीटबेल्ट यांचा वापर करत आहेत. पूर्वी वाहतूक अधिकारी नियमभंग केल्याविषयी शहरात जवळपास २०० चलने देत असत; परंतु आता हे प्रमाण पुष्कळ न्यून झाले आहे.
याविषयी वाहूतक अधिकारी ब्रँडन डिसोझा म्हणाले, ‘‘आता लोक हेल्मेटचा वापर करत आहेत. प्रदूषण तपासणी केंद्र आणि विमा कार्यालयांसमोर रांगा लागत आहेत. या कायद्याची कार्यवाही करण्याचा हेतू साध्य झालेला दिसत आहे. यामुळे आता अपघात अल्प होतील आणि अनेकांचे जीव वाचतील.’’