झव्हेरी बाजारातील ‘मेसर्स चामुंडा बुलीयन’ आस्थापनावर धाड !

कार्यालयातील भिंतीत १० कोटी रुपयांसह १९ किलो चांदीच्या विटा !

मुंबई – येथील झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या आस्थापनाची वार्षिक उलाढाल सहस्रो कोटी रुपयांनी वाढली होती. या प्रकरणी वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) विभागाला संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली.

या कारवाईमध्ये भिंतीमध्ये लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाख रुपयांची रोकड आणि १३ लाख रुपये किंमतीच्या १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

मेसर्स चामुंडा बुलीयनची वर्ष २०२० मध्ये २२ कोटी रुपये आर्थिक उलाढाल होती. वर्ष २०२२ मध्ये ती १ सहस्र ७६४ कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढली. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या धाडीत आस्थापनाच्या अनेक शाखांची नोंदणी नसल्याचे आढळून आले.

राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने गेल्या काही मासांपासून वस्तू आणि सेवा कर चोरी शोधणे आणि कारवाईची मोहीम तीव्र केली असून सहस्रो कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.