उद्या चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी (२३.४.२०२२) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पू. सौरभ जोशी यांच्या चरणी २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
२७ ते ३० नोव्हेंबर २०२१ या ४ दिवसांत मला प्रतिदिन एक घंटा पू. सौरभ जोशी यांची सेवा (त्यांना भजन म्हणून दाखवणे आणि त्यांच्याशी बोलणे इत्यादी) करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. बालकभावात असलेले पू. सौरभ जोशी !
पू. सौरभदादा बालकभावात असून निर्मळता हा त्यांचा गुण आहे. ते गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अखंड अनुसंधानात असतात. त्यांच्या कृतीतून ते आम्हाला निरागस आनंद देत होते. ‘त्यांच्या हसण्यामधून वातावरणात दैवी आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला वाटले.
२. पू. सौरभ जोशी यांची अनुभवलेली प्रीती !
मला खाऊ देण्यासाठी पू. सौरभदादांनी त्यांच्या बाबांना आग्रह केल्यावर त्यांनी एकदा मला चॉकलेट दिले. एक दिवस ‘टोस्ट’ प्रसाद म्हणून दिला. एक दिवस खाऊ देतांना त्यांनी ‘मऊ-मऊ’, असे म्हटले. तेव्हा त्यांचे बाबा म्हणाले, ‘‘आज प्रसादाला लाडू आहेत, हे त्यांना ठाऊक आहे.’’ त्या दिवशी त्यांनी मला लाडूचा प्रसाद दिला. यावरून संतांच्या निरपेक्ष प्रीतीची अनुभूती मला घेता आली. ते कुठल्याही अवस्थेत असले, तरी साधकांवर असलेली प्रीती ते व्यक्त करतात. ‘गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांच्या सेवेत रहाता आले आणि आनंद अनुभवता आला’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
३. गुरुपादुकांविषयी आलेली अनुभूती
३ अ. नंदुरबार सेवाकेंद्रातील साधकाने भावप्रयोग सांगण्यास सांगितल्यावर ‘आपण गुरुपादुका आपल्या मस्तकावर धारण केल्या आहेत’, असा भावप्रयोग करून पाठवणे : २९.११.२०२१ या दिवशी मी पू. सौरभदादांच्या खोलीत सेवेला जात असतांना नंदूरबार सेवाकेंद्रातील एका साधकाचा भ्रमणभाष आला. त्यांना सत्संगात भावप्रयोग घेण्यासाठी तो माझ्याकडून लिहून हवा होता. मी पू. सौरभदादांच्या खोलीत बसून ‘गुरुपादुका आपण मस्तकावर धारण केल्या आहेत’, असा गुरुपादुकांच्या संदर्भातील भावप्रयोग लिहून त्यांना पाठवला.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या समोर असणाऱ्या खोक्याचा सूक्ष्मातील प्रयोग करतांना ‘त्यात गुरुपादुका असतील’, असे वाटणे आणि खरोखरच त्यात गुरुपादुका असणे : त्यानंतर मी पू. सौरभदादांना भजन म्हणून दाखवले. काही वेळाने पू. सौरभदादांचे वडील (श्री. संजय जोशी) त्यांची सेवा आटोपून खोलीत आल्यावर मला म्हणाले, ‘‘तुम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर ठेवलेला खोका बघितला का ?’’ मी ‘‘नाही’’ म्हटले. त्यांनी तो खोका माझ्या हातात दिला आणि विचारले, ‘‘काय जाणवते ?’’ मी म्हटले, ‘‘मला त्यातून चंदनाचा सुगंध येत आहे.’’ त्यांनी विचारले, ‘‘खोक्यात काय असेल ?’’ क्षणभर मी गुरुदेवांच्या पादुकांचे भावपूर्ण स्मरण केले आणि त्यांना सांगितले, ‘‘गुरुपादुका आहेत.’’ खोका उघडल्यावर खरोखरच त्यामध्ये औदुंबराच्या काष्ठाच्या छोट्या गुरुपादुका होत्या. पू. सौरभदादांना त्या भेट मिळाल्या होत्या.
प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) किती महान आहेत. मी जो भावप्रयोग केला, तो लगेचच प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी गुरुदेवांनी मला दिली; म्हणून कोटीशः कृतज्ञता !
४. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. सौरभ जोशी खेळलेल्या खेळण्याला चंदनाचा सुगंध येणे
पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर पू. सौरभदादांच्या खोलीत आले असतांना ते पू. सौरभदादांच्या समवेत खेळण्याने खेळले होते. ते खेळणे श्री. जोशी यांनी मला दाखवले. त्याला अष्टगंधाचा सुगंध येत होता. तेव्हा माझी भावजागृती झाली.
– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२२)
पू. सौरभ जोशी यांची सेवा केल्याने प्रारब्ध आणि त्रास न्यून होत असल्याची कु. गौरी मुद्गल यांनी घेतलेली प्रचीती !
२३.१०.२०२१ ते २५.१०.२०२१ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. गौरी मुद्गल यांना पू. सौरभदादांना महाप्रसाद भरवणे आणि त्यांच्या चरणांना मर्दन करणे या सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. सौरभदादांमध्ये नटखट कृष्ण दिसणे
मी पू. सौरभदादांना जेवण भरवतांना ते मध्येच तोंड बंद करणे किंवा मधेच हसणे, असा खोडकरपणाही करत. तेव्हा मला त्यांच्यामध्ये नटखट कृष्ण दिसून माझा श्रीकृष्णाचा नामजप आतून चालू होत होता.
२. पू. सौरभदादांच्या चरणांना मर्दन करतांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि शक्ती मिळणे अन् शारीरिक त्रास न्यून होणे
पू. सौरभदादांच्या चरणांना मर्दन करतांना मला प्रचंड प्रमाणात चैतन्य आणि शक्ती मिळत असे अन् माझी मरगळ निघून जात असे. त्यांच्या चरणांतून चंदनाचा सुगंध यायचा. तेव्हा ‘माझ्या शरिरातील उष्णता तीव्रतेने बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत असे. मला पुष्कळ शारीरिक त्रास आहेत.
पू. सौरभदादांची सेवा करायला लागल्यापासून माझ्या त्रासांचे प्रमाण न्यून होऊन मला माझे शरीर हलके झाल्याचे जाणवत आहे.
३. मर्दन केलेल्या तळहातांना सुगंध येणे आणि त्यातून आध्यात्मिक लाभ होणे
पू. सौरभदादांच्या पायांना मर्दन केल्यानंतर माझ्या तळहाताला बराच वेळ सुगंध येत असे. मी तो हात माझ्या आईला (सौ. वैशाली मुद्गल हिला) दाखवल्यावर तिला आध्यात्मिक लाभ होत असत. माझ्या हाताचा सुगंध बराच काळ टिकून रहात असे.
४. मला ‘त्यांच्या खोलीचा आकार मोठा होत आहे’, असे जाणवते.
(‘ही आकाशतत्त्वाची अनुभूती आहे.’ – संकलक)
ही सेवा करतांना ‘संतांच्या सेवेतून प्रारब्ध आणि त्रास न्यून होतात. संतांची कृपा होऊन त्यांचा आपल्यासाठी संकल्प होतो’, हे मला शिकायला मिळाले.
– कु. गौरी मुद्गल (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)
पू. सौरभदादांनी सूक्ष्मातून नामजपादी उपाय केल्याचे जाणवून शारीरिक त्रास अल्प होणे
१. ‘पू. सौरभ जोशी ‘ताई, ताई’ म्हणत असल्याने त्यांना सौ. स्वातीताईशी बोलायचे असेल’, या विचाराने श्री. संजय जोशी यांनी ताईंना भ्रमणभाष करणे
आम्ही पुण्यात असतांना एकदा आम्हाला पू. सौरभदादांच्या वडिलांचा (श्री. संजय जोशी यांचा) भ्रमणभाष आला. त्यांनी मला सांगितले, ‘‘पू. सौरभदादा ‘ताई, ताई’ म्हणत होते. ‘त्यांना कोणत्या ताईशी बोलायचे आहे ?’, असा विचार केल्यानंतर तुम्ही कुटुंबीय बरेच दिवसांपासून आश्रमात दिसला नाहीत.
‘पू. दादांना सौ. स्वातीताईंशी (पत्नीशी) बोलायचे असेल’, असे मला वाटले. त्यामुळे मी तुम्हाला भ्रमणभाष केला.’’ तेव्हा मी पू. सौरभदादांशी बोललो. त्यानंतर त्यांच्या बाबांनी आम्हाला सांगितले, ‘‘पू. सौरभदादा ‘मी आहे’, असे म्हणत आहेत.’’ तेव्हा आम्हा चौघांची (मी, पत्नी आणि माझ्या दोन मुली यांची) भावजागृती झाली.
२. पू. सौरभ जोशी यांच्याशी बोलल्यानंतर ‘सहा मास होत असलेला हाताचा त्रास पूर्ण थांबला आहे’, असे लक्षात येणे
शेवटी श्री. संजय जोशी यांनी ‘तुमच्या हाताचा त्रास कसा आहे ?’, असे मला दोनदा विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘माझा त्रास न्यून झाला आहे.’’ भ्रमणभाष ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘सहा मासांपासून होत असलेला माझ्या हाताचा त्रास आता थांबला आहे. (माझ्या संपूर्ण डाव्या हातामध्ये मुंग्या येऊन मला पुष्कळ वेदना व्हायच्या. त्यामुळे मला हात सरळ किंवा वर-खाली करता येत नव्हता आणि वजनही उचलता येत नव्हते. त्यासाठी औषधोपचार चालू होते. त्यामुळे वेदना न्यून झाल्या; पण हाताला मुंग्या येणे न्यून झाले नव्हते.) दोन दिवसांपूर्वी अकस्मात् मुंग्या येणेही पूर्ण थांबले. ‘हे कशामुळे थांबले ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हाच मला वाटले, ‘पू. सौरभदादांनी सूक्ष्मातून नामजपादी उपाय करून माझा हा त्रास नष्ट केला.’
नंतर मी भ्रमणभाष करून श्री. संजय जोशी यांना याविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘या अगोदरही काही साधकांना पू. सौरभदादांच्या संदर्भात अशा अनुभूती आल्या आहेत.’’ त्या दिवसापासून मी औषधे घेणेही बंद केली आहेत. आजपर्यंत मला डावा हात दुखण्याचा त्रास पुन्हा झाला नाही. आता मी पहिल्यासारखे डाव्या हाताने वजनही उचलू शकतो.’
– श्री. सुनील सोनीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |