हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी, तसेच हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी संघटना यांचा उपक्रम !
मुंबई – प्रभु श्रीरामचंद्र यांच्या कृपेने रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांत २२७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
हिंदु जनजागृती समितीची कार्यक्रमामागील भूमिका !
हिंदूंचा इतिहास हा शौर्यशाली आहे. गेल्या ७५ वर्षांत हिंदूंचे शौर्य जागृत होईल, असे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. याउलट ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल…’ अशा प्रकारे संदेश देऊन हिंदूंच्या भावी पिढ्यांनाही शौर्यापासून वंचित केले जात आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रूप पाहिले असता, प्रत्येक देवतेचा एक हात आशीर्वाद देणारा, तर अन्य सर्व हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवतेच्या प्रत्येक रूपाचे पूजन हिंदूंनी केले पाहिजे. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचेही पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. अन्याय अत्याचार यांच्या विरोधात लढण्यासाठी शौर्यच आवश्यक असते. त्यामुळे धार्मिक सणांच्या दिवशी प्रतिकात्मक का होईना, पण शस्त्रपूजन झाले पाहिजे. हिंदूंमध्ये शौर्यजागरण झाले पाहिजे. हिंदूंनी आपल्या सण आणि उत्सव यांच्या माध्यमांतून शस्त्रपूजनाच्या परंपरा जपल्या पाहिजेत.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, यवतमाळ आणि अमरावती; कर्नाटकात बागलकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, मैसुरू, तुमकूर, बेंगळुरू आणि बेळगांव; गोव्यात फोंडा आणि साखळी; उत्तरप्रदेशात मथुरा, मध्यप्रदेशातील उज्जैन यांसह देहली आणि राजस्थान येथेही सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.
असे होते ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे स्वरूप !
- शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ
- सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, मारुतीची आरती, मारुती स्त्रोत्र आणि ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप
- ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’, याविषयी मार्गदर्शन
- कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी प्रतिज्ञा