पू. भाऊ (सदाशिव) परब (वय ७९ वर्षे) यांनी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात समाजातील लोकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांनी त्यांची दिलेली उत्तरे

‘पू. भाऊ (सदाशिव) परब यांनी लिहिलेल्या या अप्रतिम लेखामुळे सर्वच साधकांना इतरांनी असे प्रश्न विचारले, तर काय उत्तर द्यायचे, हे शिकायला मिळेल. भाऊंचा हा लेख म्हणजे साधकांसाठी एक फार मोठा सत्संग आहे. साधकांसाठीच नाही, तर काही संतांनाही यातील सूत्रांवरून काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद होईल. या लेखाबद्दल भाऊंचे अभिनंदन करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतो. सध्या मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना आणि सेवा करतो. (सध्या पू. भाऊ (सदाशिव) परब मिरज आश्रमात असतात.) माझी मानलेली बहीण सौ. मनीषा कृष्ण मणेरीकर हिला (तिचे लग्नापूर्वीचे नाव प्रमिला माधव कुडके होते.) समाजातील लोक माझ्या संदर्भात नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. श्री गुरुमाऊलींना शरणागत भावाने प्रार्थना करून समाजातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. ‘हे गुरुमाऊली, ‘माझ्या माध्यमातून आपणच योग्य आणि अपेक्षित अशी उत्तरे द्या’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.

पू. सदाशिव परब

१. प्रश्न : श्री. भाऊ (सदाशिव) परब सनातनकडे का वळले ?

१ अ. उत्तर : ८४ लक्ष योनी फिरल्यानंतर देवाने मनुष्यजन्म दिला आहे. या जन्माचे सार्थक होण्यासाठी, म्हणजेच जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होण्यासाठी मला सनातन संस्थेत सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना १०० टक्के पटली; म्हणून मी सनातन संस्थेकडे वळलो आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझी साधना चालू आहे.

२. प्रश्न : श्री. भाऊ (सदाशिव) परब घरदार सोडून एकटेच आश्रमात का गेले ?

२ अ. उत्तर : मी माझ्या कुटुंबियांची आश्रमात राहून साधना करण्यासाठी पूर्ण संमती घेऊन आश्रमात आलो. मला एकट्यालाच देवाने साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमात नेले. ‘गुरु माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करवून घेऊन मला पूर्णत्वास नेणार आहेत’, अशी मला १०० टक्के निश्चिती आहे आणि माझ्यावर तशी कृपाही झाली आहे.

३. प्रश्न : वानप्रस्थाश्रमात जातांना त्यांनी पत्नीला समवेत का नेले नाही ?

३ अ. उत्तर : ‘मी वानप्रस्थाश्रमासाठी सनातन संस्थेत गेलो’, असे काही नाही. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणारा साधक संन्यासाश्रमात असतो. त्यांना वानप्रस्थाश्रमाची आवश्यकता लागत नाही. माझ्या पत्नीची तेवढी साधना नसल्यामुळे तिला आश्रमात समवेत नेता आले नाही.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, अशी सनातनची शिकवण आहे. त्याप्रमाणे पुढे तिची साधना झाली, तर गुरुच तिला आश्रमात आणतील. सनातन संस्थेत अशी अनेक उदाहरणे आहेत.

४. प्रश्न : पत्नीची इच्छा मोडून असे आश्रमात जाणे योग्य आहे का ?

४ अ. उत्तर : पत्नीने साधना करण्यासाठी आश्रमात जाण्याची इच्छाच प्रकट केली नाही, तसेच साधना करण्यासाठी लागणारी तळमळ आणि चिकाटी तिच्यात नाही. ती संसारात अडकलेली आहे; म्हणून तिला आश्रमात नेता आले नाही. यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे उदाहरण देता येईल. साधनेसाठी आश्रमात रहातांना स्वेच्छेला महत्त्व न देता परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांना महत्त्व दिले जाते. हे सर्वांना जमणे कठीण असते.

५. प्रश्न : आधुनिक जगात वृद्धाश्रम निर्माण होत आहे. हे किती योग्य आहे ?

५ अ. उत्तर : सनातन संस्थेमध्ये वृद्धाश्रम असे काही नाही. ज्या मुलांना वृद्ध कुटुंबियांचा घरी सांभाळ करणे शक्य होत नाही, ती मुले पैसे भरून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे योग्य नाही.

६. प्रश्न : आता चालू काळात नातवांना आजी-आजोबांचे प्रेम आणि सुसंस्कार यांची आवश्यकता असल्याचे भाऊंच्या लक्षात येत नाही का ?

६ अ. उत्तर : चालू काळात माझ्या घरातील बालकांवर त्यांचे आई-वडील आणि आजी यांच्याकडून प्रेम देणे अन् सुसंस्कार करणे चालूच आहे. मी वर्षातून २ – ३ वेळा सणासुदीला घरी गेल्यावर नातवंडांना साधना सांगतो. ‘घरातील बालकांवर साधनेचे संस्कार करायला पाहिजेत’, याची मला जाणीव आहे.

७. प्रश्न : गोव्यात राहून भाऊंना सनातनची साधना करता आली नसती का ?

७ अ. उत्तर : मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही साधना करता येते. त्याला स्थळ-काळाची मर्यादा नाही. माझ्याविषयी सांगायचे झाले, तर माझ्या साधनेची काळजी माझ्यापेक्षा माझ्या गुरूंनाच अधिक आहे; म्हणून गुरूंनीच मला साधनेत प्रगती करण्यासाठी त्यांना योग्य वाटते, त्या स्थळी ठेवले आहे. अध्यात्मात स्वेच्छेला महत्त्व नसून परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांना महत्त्व असते; म्हणूनच मी गोव्यात रहाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

८. प्रश्न : ‘भाऊ कर्तव्यदक्ष, कष्टाळू आणि प्रेमळ आहेत’, असे तुम्ही म्हणता, तर आताची जी क्रिया चालू आहे (म्हणजे आश्रमात राहून साधना करणे), ती योग्य आहे का ?

८ अ. उत्तर : हो, योग्यच आहे. मी मनुष्यजन्माची ६० वर्षे आणि आता आयुष्याच्या शेवटी कुटुंबातील कर्तव्ये पूर्ण करून साधना करत आहे, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे. ‘यात काही पाप नाही’, असे संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात.

‘माझे पूर्वजन्माचे भाग्य म्हणून देवाने मला मोक्षगुरु श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची प्राप्ती करून दिली’, यासाठी मी त्याच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून करवून घेतले’, यासाठी त्यांच्या चरणी माझे कोटी कोटी साष्टांग नमस्कार !’

– (पू.) श्री. भाऊ (सदाशिव) परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१०.२०१८)