हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !
२० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी
वाराणसी – भारतात ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंचे दमन करण्यात येत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांची भावी पिढी धर्माभिमानाला वंचित झाली आहे. डाव्यांनी निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आजची पिढी मोगलांनाच त्यांचे आदर्श समजत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षण मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडेय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसीच्या आशापूर येथील अर्चना गार्डनमध्ये ३ एप्रिल या दिवशी ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षण मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडेय; भारत सेवाश्रम संघ, वाराणसीचे स्वामी ब्रह्ममयानंदजी; रामनगर इंडस्ट्रियल असोसिएशन, वाराणसीचे अध्यक्ष श्री. देव भट्टाचार्य आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांचे कौतुक करतांना ‘रामनगर इंडस्ट्रियल असोसिएशन, वाराणसी’चे अध्यक्ष श्री. देव भट्टाचार्य म्हणाले की, साधकांचे आचार-विचार, पेहराव संपूर्ण भारतीय संस्कृतीनुसार आहे. त्यांच्या तोंडवळ्यावर शांती, शालीनता आणि अद्भुत तेज आहे. |
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे. राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी धर्माच्या बाजूने रहाणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. वर्ष २०२५ नंतर सत्त्वगुणी हिंदूकडून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे.
या वेळी स्वामी ब्रह्ममयानंदजी म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. आपल्याला प्रतिवाद आणि प्रतिसाद यांचे धोरण स्वीकारावे लागेल. |