उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेनंतरही पोलिसांकडून प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांवर कारवाई नाही !

न्यायालयाचा अवमान करणार्‍या प्रशासनावर न्यायालयाने कठोर कारवाई केली, तरच यापुढे न्यायालयाचा अवमान करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक 

मुंबई – प्रार्थनास्थळांवर अवैधपणे लावलेल्या ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही याविषयी कारवाई न झाल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेनंतरही अद्याप पोलिसांकडून या प्रकरणी पूर्ण कारवाई केली गेलेली नाही.

याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी वर्ष २०१४ मध्ये ‘नवी मुंबईतील ४९ मशिदींपैकी ४५ मशिदींमध्ये अवैधपणे लावलेले ध्वनीक्षेपक हटवण्यात यावेत’, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. याचिकेच्या सुनावणीत राज्यात प्रार्थनास्थळांवर २ सहस्र ९४० ध्वनीक्षेपक अवैधपणे लावल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी मशिदी, दर्गा आणि मदरशे यांवर १ सहस्र ७६६, मंदिरांमध्ये १ सहस्र २९, चर्चमध्ये ८४, गुरुद्वारांमध्ये २२ आणि बुद्धविहारांमध्ये ३९ ध्वनीक्षेपक लावले असल्याचे उघड झाले होते.

हे प्रकरण वर्ष २०१६ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात चालले. त्यानंतर उच्च न्यायालयाने सर्व धार्मिक स्थळांवर अशाप्रकारे लावलेले सर्व ध्वनीक्षेपक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यावरही प्रभावीपणे कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यावर याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी मुंबई उच्च न्यायालयात वर्ष २०१८ मध्ये अवमान याचिका प्रविष्ट केली होती. अधिवक्ता दिनदयाळ घनुरे यांनी सांगितले की, या प्रकरणी राज्य सरकारने ४ वेळा प्रतिज्ञापत्राद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.