आता ‘कार्ड’विनाही ए.टी.एम्. मधून काढता येणार पैसे !

रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण घोषणा !

नवी देहली – ‘डिजिटल’ फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यांतर्गत रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ए.टी.एम्.मधून कार्डशिवाय (कार्डलेस) पैसे काढण्याची सुविधा चालू करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ही सुविधा देशातील काही बँकांकडूनच दिली जात होती. ही सुविधा ग्राहकांना तेव्हाच मिळते, जेव्हा ते संबंधित बँकेचे ए.टी.एम्. वापरतात. आता या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, ‘‘आता यूपीआय (पैशांची तात्काळ देवाणघेवाण होण्यासाठी वापरण्यात येणारी ऑनलाईन प्रणाली) वापरून सर्व बँका आणि ‘ए.टी.एम्. नेटवर्क’वर कार्डलेस रोख पैसे काढण्याच्या सुविधेचा प्रस्ताव आहे. कार्डलेस पैसे काढण्याच्या सुविधेमुळे ‘कार्ड स्किमिंग’ म्हणजेच कार्डची तांत्रिक माहिती आणि ‘पिन’ चोरण्याच्या पद्धतीसारख्या गोष्टींना आळा बसेल. कार्डविना ए.टी.एम्.मधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. ही पूर्ण प्रणाली ‘ओटीपी’च्या साहाय्याने काम करते.’’