शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एस्.टी. कर्मचाऱ्यांचे आक्रोशपूर्ण आंदोलन !

घोषणा देऊन आंदोलकांकडून दगडफेक !

मुंबई – एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकार उत्तरदायी आहे, असा आरोप करत ८ एप्रिल या दिवशी वरळी येथील ‘सिल्व्हर ओक’ या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह महाविकास आघाडी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी दगडफेक केली. या वेळी काही आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले.

मागील ५ मासांपासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. आंदोलकांनी निवासस्थानाच्या कुंपणावरून पुढे जात शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने दगडफेक करत चपला भिरकावल्या. एस्.टी. कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण न होण्याला दोषी ठरवून महिला आंदोलकांनी शरद पवार यांना दूषणे दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांचे संख्याबळ अपुरे असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात यायला वेळ लागला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांत रहाण्याचे आवाहन केले. शांत राहून चर्चेस सिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलन चिघळवण्यामागील शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र काही शक्ती राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन ठरवून करण्यात आले आहे. एस्.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळवण्यामागील अदृश्य शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.

टोकाची भूमिका घेणे, ही महाराष्ट्राची परंपरा नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

मुंबई – टोकाची भूमिका घेणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत; परंतु चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. नेता चुकीचा असला, तर काय होते, हे आजच्या आंदोलनातून दिसले.’’


शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनामुळे मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह !

मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आझाद मैदानावर आंदोलन करत असलेले कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले असतांना पोलिसांच्या ते लक्षात कसे आले नाही ? हे गृहविभागाचे अपयश असल्याचे मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे.

आंदोलनानंतर ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. ‘बॅरिकेटस्’ लावून आझाद मैदानात जाण्याचे आणि बाहेर येण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत. आंदोलनानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन परिस्थितीची पहाणी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुनील तटकरे यांनीही ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट दिली. पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना ‘यलो गेट’ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.