१. आध्यात्मिक त्रास वाढणे
‘२०.२.२०१९ या दिवशी सायंकाळी ६.४० वाजता देवद आश्रमात आदिशक्ती संप्रदायाने देवीची अखंड ज्योत आणली होती. त्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून मला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला होता. मला नामजप प्रयत्नपूर्वक करावा लागत होता.
२. साधिकेकडून झालेल्या विविध प्रार्थना
२ अ. ज्योतीत तेल घालतांना : आम्हाला ज्योतीमध्ये तेल घालून आपले त्रास आणि अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायला सांगितले होते. तेव्हा मी ‘गुरुचरणी जाण्यात येणारे सर्व अडथळे दूर होऊ देत. आम्हा साधकांची प्रगती होऊ दे’, अशी प्रार्थना केली.
२ आ. ज्योतीला प्रदक्षिणा घालतांना : मला आतून शांत वाटत होते. तेव्हा माझ्याकडून ‘हे माते, परात्पर गुरुमाऊलीला अपेक्षित असे मला लवकर घडव. माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर’, अशी तळमळीने प्रार्थना झाली.
२ इ. ज्योतीकडे पहातांना : श्री दुर्गादेवीचे स्मरण होऊन माझ्याकडून तळमळीने पुढील प्रार्थना झाली, ‘हे माते, आम्हा साधकांचे आणि माझ्या कुटुंबियांचे साधनेतील अडथळे दूर होऊ देत.’
३. आलेल्या अनुभूती
अ. ज्योतीच्या दर्शनाला गेल्यावर मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता.
आ. ज्योतीचे दर्शन घेऊन अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना केल्यापासून मला पुष्कळ हलके वाटू लागले.
४. ज्योत गेल्यानंतर ती ठेवलेल्या ठिकाणी उभे राहिल्यावर जाणवलेली सूत्रे
ज्योत गेल्यानंतर आम्हाला ‘त्या ठिकाणी उभे राहून काय वाटते ?’, याचे निरीक्षण करण्यास सांगितले. ज्योत असतांना मला दैवी सुगंध येत होता. माझे मन शांत आणि आनंदी झाले होते. ज्योत जेथे ठेवली होती, तिथे उभे राहून प्रार्थना केल्यावर माझे मन शांत होऊन माझ्याकडून भावपूर्ण प्रार्थना होत होती. माझ्या पायाला संवेदना जाणवत होत्या. ‘पायांतून काहीतरी खेचले जात आहे’, असे मला जाणवत होते. मला दिव्य सुगंध येऊन पुष्कळ उत्साही आणि आनंदी वाटत होते.
परात्पर गुरुमाऊलीमुळे मला हे अनुभवता आल्यामुळे ‘परात्पर गुरुदेव आणि श्री दुर्गामाता यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.२.२०१९)
|