भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

भाजपच्या ४२ व्या स्थापनादिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

नवी देहली – काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले,

१. एक काळ आसा होता, जेव्हा लोकांना असे सतत वाटत होते की, कोणतेही सरकार आले, तरी परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही; पण भाजपने या धारणेमध्ये पालट घडवला.

२. आज देशाकडे धोरणे आणि निर्णय घेण्याची शक्ती आहे. आपले सरकार राष्ट्रीयत्वाला महत्त्व देते. आपण जी लक्ष्ये ठेवत आहोत, ती पूर्ण करत आहोत. सरकार देशहित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे. त्यामुळे आपल्याला ‘सबका साथ सबका विकास’ यासह आता ‘सबका विश्‍वास’ही मिळत आहे.

३. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या काळात भारताचे विचार आत्मनिर्भर होण्याचे, तसेच सामाजिक न्याय आणि समरसतेचे आहेत. याच संकल्पांच्या आधारे एका विचारबीजाच्या रूपात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती; म्हणूनच हा अमृतकाळ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कर्तव्यकाळ आहे.