मुंबई – ‘जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार उत्तरदायी’ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहात का ?, असा मतचाचणीचा कौल २ एप्रिल या दिवशी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ या दैनिक ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर घेण्यात आला. या प्रश्नाला ७४.५ टक्के वाचकांनी ‘होय’ असे उत्तर देऊन जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार यांना उत्तरदायी ठरवले आहे. या मतचाचणीमध्ये २३.१ टक्के वाचकांनी ‘नाही’ हा पर्याय निवडला, तर २.४ टक्के जण तटस्थ राहिले. ७ सहस्र ६९७ वाचकांनी यामध्ये त्यांचे मत नोंदवले.
गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या सार्वजनिक सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण चालू झाले. महाराष्ट्रात पूर्वी जातीचा अभिमान होता; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जातींमध्ये द्वेष निर्माण केला. शरद पवार यांना जातीपातीचे राजकारण हवे आहे’, असे वक्तव्य केले होते. यावर शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी पक्षामध्ये सर्व जातींचे लोक आहेत. आरोप करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यास करावा’, असे म्हटले होते.