|
विद्यार्थ्यांकडून लाच मागणाऱ्या डॉ. उज्ज्वला भडंगे यांचे केवळ निलंबन नको, तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली पाहिजे. आतापर्यंत किती विद्यार्थिनींकडून लाच घेतली आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. असे प्राध्यापक शिक्षणक्षेत्र कलंकित करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई हाच पर्याय आहे. – संपादक
संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील पी.एच्.डी. करणाऱ्या २ विद्यार्थिनींकडून प्रत्येकी २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी विद्यापिठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांना विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी १ एप्रिल या दिवशी निलंबित केले आहे.
पी.एच्.डी.ची विद्यार्थिनी कु. अंजली घनबहाद्दर यांनी डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्याशी भ्रमणभाषवर लाचेची रक्कम मागितल्या संदर्भात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप बेगमपुरा पोलीस ठाण्यात देऊन या विरोधात तक्रारही प्रविष्ट केली होती. हा ऑडिओ समाजमाध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यानंतर विद्यापीठ परिसरात याविषयी पुष्कळ चर्चा होऊन विद्यापिठातील अशा प्रकारांना आळा घातलाच पाहिजे, तसेच अशा प्रकारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, यांसाठी सर्वपक्षीय संघटनांनी ३१ मार्च या दिवशी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या दालनात आंदोलनकर्त्यांनी लाच मागणाऱ्या विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर डॉ. येवले यांनी डॉ. भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.