मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठी भाषा भवनाच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मराठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला, तर त्याला अक्कल शिकवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. २ एप्रिल या दिवशी मराठी भाषा भवनाच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मातृभाषेच्या मंदिराचे भूमीपूजन करत असल्याचे समाधान आहे. मुंबई आम्ही लढून मिळवली आहे. मराठी म्हटले की, संघर्ष आलाच. माझ्या कुटुंबियांचे मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान आहे. कुणीही यावे आणि आमच्या उरावर (देहावर) बसावे, हे आम्ही खपवून घेणार नाही. मराठी भाषेसाठी कायदे करण्याची वेळ का आली ? अनेक जण मराठी भाषेवर बोलत आहेत; मात्र माझी विनंती आहे की, मराठी भाषेवर नाही, तर मराठी भाषेत बोला. आमच्यावर प्रतिदिन टीका होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका व्हायची की, हे मराठी-मराठी करतात आणि यांची मुले इंग्रजी शाळेत जातात; परंतु बाळासाहेबांनी शाळेत इंग्रजी आणि घरात मराठी भाषेत बोलायला सांगितले होते. भाषा शिकणे हा काही गुन्हा आहे का ?