रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रांगणातील कमलपिठामध्ये उमललेल्या ‘लक्ष्मीकमळाची’ सूक्ष्म परीक्षणातून जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

कमलपिठामध्ये उमललेले ‘लक्ष्मीकमळ’

महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रांगणात कमलपिठाची स्थापना केलेली आहे. या कमलपिठाचे आणि आश्रमातील वाटिकेचे दायित्व कु. सोनाली खटावकर या साधिकेकडे आहे. ती वाटिका-सेवा अत्यंत भावपूर्ण, प्रेमाने आणि तळमळीने करते. तिने आश्रमाच्या परिसरात विविध कुंड्यांमध्ये अनेक रोपांची लागवड करून त्यांची सुंदर रचना केलेली आहे. त्यामुळे आश्रमाच्या शोभेत वृद्धी झालेली आहे. कमळपिठामध्ये कमळ उमलावेत यासाठी श्री. अमोल कुळवमुडे यांनी कमळपिठामध्ये सुपिक माती आणि खत घालून त्याचा चिखल बनवणे, त्यामध्ये कमळाची रोपे लावणे इत्यादी पुष्कळ श्रम केले. श्री. अमोल कुळवमुडे आणि कु. सोनाली खटावकर यांच्यातील भाव अन् तळमळ यांच्यामुळे १.४.२०२२ या दिवशी कमळपिठामध्ये गुलाबी रंगाचे ‘लक्ष्मीकमळ’ उमलले आहे. या कमळाकडे पाहिल्यावर पुढील सूत्रे जाणवली.

१. कमळाकडे पाहून पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवतो. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी आणि आनंदमय झाले आहे. (मलाही असेच जाणवले. – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ)

२. या कमळामध्ये श्रीमहालक्ष्मीदेवीचे दोन टक्के तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवते. या कमळातून वातावरणात गुलाबी रंगाचे लक्ष्मीतत्त्व प्रक्षेपित होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न वाटते.

३. कमळपिठामध्ये गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी उमललेले ‘लक्ष्मीकमळ’ हे शुभसूचक आहे. यावरून ‘पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची पहाट लवकरच होणार आहे’, असा संकेतच जणू लक्ष्मीकमळ देत आहे’, असे जाणवते.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२२)

कमळपीठ स्थापन केल्यापासून तेथे प्रारंभी कमळे उमलली; पण त्यानंतर कमळे उमलणे बंद झाले होते. एक दिवस मी श्री महालक्ष्मीदेवीला कळकळीने प्रार्थना केली, ‘हे महालक्ष्मीदेवी, तुझ्यासाठी तरी या कमलपिठामध्ये कमळ उमलू दे. तुझा कृपाशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू दे.’ त्यानंतर मी सूक्ष्मातून श्री महालक्ष्मीदेवीचे चित्र कमळपिठात ठेवले. त्यानंतर २ दिवसांनी एक छोटीशी कळी पानांच्या मधोमध दिसली. माझी प्रार्थना देवीपर्यंत पोचल्याचे पाहून माझी खूप भावजागृती झाली. हे कमळपुष्प म्हणजे श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद आणि आशीर्वादच आहे.

– कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/ सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक