(म्हणे) ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती देण्याची आवश्यकता नव्हती !’ – शरद पवार

काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय गेले ३२ वर्षे शरद पवार यांच्यासारख्या कथित निधर्मीवाद्यांमुळे दडपण्यात आला. तो आता उघड होत असल्याने हिंदू जागृत होत आहेत आणि त्याचा परिणाम शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या राजकीय पक्षांना निवडणुकीत भोगावा लागणार आहे. यामुळेच ते असे विधान करत आहेत !

नवी देहली – काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले; पण तिथे मुसलमानांनाही लक्ष्य बनवले गेले होते. ‘कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही अनुमती देण्याची आवश्यकता नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी फुकाची टीका पवार यांनी केली. ‘मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती, तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते; पण हे सरकार मुसलमानांच्या विरोधात लोकांच्या भावना भडकावण्याचे काम करत आहे’, असा आरोपही शरद पवार यांनी केला. ते देहलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप यांनी केला.

पवार पुढे म्हणाले की, काश्मिरी पंडित आणि मुसलमान यांच्यावरील आक्रमणांमागे पाकिस्तानातील आतंकवादी संघटना उत्तरदायी होत्या. तसेच काश्मीर प्रश्‍नाला सातत्याने नेहरूंना उत्तरदायी धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोर्‍यातून बाहेर पडले तेव्हा केंद्रात विश्‍वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार होते. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महंमद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर देहलीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती,

उघड ढोंगीपणा दिसत असतांनाही मी त्यांचा आदर करतो ! – विवेक अग्निहोत्री यांचे प्रत्युत्तर

शरद पवार यांच्या टीकेवर ‘कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करून उत्तर देतांना म्हटले, ‘काही दिवसांपूर्वी विमान प्रवासाच्या वेळी मी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली होती. या वेळी मी पाया पडलो असता दोघांनीही माझे अभिनंदन करत मला आणि माझी पत्नी पल्लवी जोशी हिला शुभेच्छा दिल्या होत्या. प्रसारमाध्यमांसमोर त्यांना काय झाले ठाऊक नाही. उघड ढोंगीपणा दिसत असतानाही मी त्यांचा आदर करतो.’

पवार यांनी टीका करतांना ‘काश्मिरी पंडितांच्या नावाखाली लाभ उठवला जात आहे’, असेही म्हटले होते. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले, ‘आदरणीय शरद पवारजी, भारतासारख्या गरीब देशात तुमच्या मते एका राजकीय नेत्याने स्वतःच्या बळावर कमावलेली संपत्ती अधिकाधिक किती असली पाहिजे ? ‘भारतात इतकी गरिबी का आहे ?’, हे तुमच्यापेक्षा अधिक चांगले कुणालाही ठाऊक असेल ? देव तुम्हाल दीर्घायुष्य आणि सद्बुद्धी देवो.’