मुलावरील विनामूल्य उपचारांसाठी वडिलांना स्वीकारायला सांगितला ख्रिस्ती धर्म !

वेल्लोर (तमिळनाडू) येथे ख्रिस्ती मिशनरी रुग्णालयाची ‘समाजसेवा !’  

  • ख्रिस्ती मिशनरी समाजसेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करतात, हेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! अशांच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना कारागृहात टाकले पाहिजे ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • तमिळनाडूतील ख्रिस्तीधार्जिणे स्टॅलीन सरकार संबंधित रुग्णालयावर काहीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील बसवना बागेवाडी येथील इराण्णा नागूर यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारांसाठी तमिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिस्ती मिशनरी रुग्णालयात माहिती विचारली असता तेथे त्यांना मुलावर विनामूल्य उपचारांसाठी काही अटी घालण्यात आल्या. यात इराण्णा यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास आणि चर्चमध्ये किमान २ मास प्रार्थना करण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले आहे. इराण्णा यांनी मुलाच्या उपचारांसाठी आधीच ३ लाख रुपये व्यय (खर्च) केले होते. त्यांच्याकडे व्यय करण्यासाठी आणखी पैसे नव्हते. त्यांना प्रतिमहा १२ सहस्र रुपये मिळतात; परंतु त्यांना जवळपास अर्धे उत्पन्न मुलाच्या वैद्यकीय उपचारांवर व्यय करावे लागत होते. त्यांच्या याच परिस्थितीचा अपलाभ मिशनरी रुग्णालयाकडून उठवण्यात आला.

इराण्णा यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी येशूला स्वीकारण्याचा निर्धार केला; कारण रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी माझ्या मुलाचा सर्व वैद्यकीय व्यय उचलण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याच वेळी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ‘बी.एल्.डी.ई. असोसिएशन’ने मुलाच्या उपचारांसाठी साहाय्य केले.’ त्यांच्या या साहाय्यामुळे इराण्णा आणि त्यांचे कुटुंब ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापासून वाचले.