गुढीपाडव्यापासून चालू होणार पुणे येथील ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन !

आळंदी (पुणे) – कोरोनामुळे मार्च २०२० पासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचे समाधीस्पर्श दर्शन बंद होते. सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने २ एप्रिलपासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजल्यापासून समाधी स्पर्श दर्शन चालू करण्याचा निर्णय देवस्थानने एका विशेष बैठकीमध्ये घेतला आहे. यामुळे भक्तांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन माऊलींचे संजीवन समाधी स्पर्श दर्शन घेता येणार आहे; मात्र या वेळी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता आणि लहान बालके यांनी संस्थानच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.