मुदाळतिट्टा (जिल्हा कोल्हापूर) – भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील २२ मार्चपासून चालू झालेल्या सद्गुरु बाळूमामा यात्रेची सांगता सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत झाली. ३० मार्च या दिवशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत ५ क्विंटल भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. श्रींच्या मंदिरावर केलेली विद्युत् रोषणाई, फुलांनी केलेली सजावट आणि मंदिर परिसरात रेखाटलेल्या सद्गुरु बाळूमामांच्या रांगोळ्या हे विशेष होते.
यात्रेसाठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक असणारे रुग्णालय, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची सोय करण्यात आली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांतील आलेल्या भाविकांना यामुळे दर्शन सुलभ झाले. ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात सारे गाव दुमदुमून गेले होते. भंडाऱ्यामुळे सगळे गाव, रस्ते पिवळे झाले होते.