काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार हा नरसंहारच ! – अमेरिकेच्या मानवाधिकार आयोगाची अधिकृत मान्यता

भारतानेही हे अत्याचार ‘नरसंहार’ म्हणून स्वीकारण्याची आयोगाची विनंती

जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !

प्रातिनिधिक छायाचित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर ह्यूमन राइट्स अँड रिलिजियस फ्रीडम’ने (मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य यांसाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय आयोगाने) जम्मू आणि काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात झालेल्या एका सुनावणीनंतर या नरसंहाराला जाहीर मान्यता देण्यात आली.

१. आयोगाने प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, २७ मार्च या दिवशी ‘काश्मिरी हिंदू नरसंहार (१९८९-१९९१)’ या विषयावर आयोगाने एका विशेष सार्वजनिक सुनावणीचे आयोजन केले होते.

२. यामध्ये अनेक पीडित, वांशिक आणि सांस्कृतिक संहारातून वाचलेल्या हिंदूंनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे पुरावे सादर केले. अनेक काश्मिरी हिंदूंनी त्यांच्यावर स्वदेशातच झालेल्या क्रूरतेच्या व्यथा धैर्याने मांडल्या.

३. ‘जिहादी आतंकवादाच्या क्रूरतेला कसे सामोरे जावे लागले ?’, ‘स्वतःच्या अस्तित्वासाठी कसा लढा द्यावा लागला ?’, ‘पुनर्वसनासाठी त्यांनी किती त्रास सहन केला ?’ आदी माहितीही या वेळी देण्यात आली.

४. प्रसिद्धीपत्रकात हिंदूंच्या नरसंहाराविषयी वस्तूनिष्ठ माहिती देण्यात आली असून ‘नरसंहाराविषयी राजकारणी, शेजारी आणि स्थानिक पोलीस यांनी डोळे झाकून कान बंद करणे, हे अत्यंत वेदनादायी होते’, असे पीडितांनी सांगितले.

५. ‘अशा शोकांतिकेतून जात असतांनाही काश्मिरी हिंदूंना सूड उगवण्यात किंवा मुसलमानविरोधी प्रचार करण्यात रस नाही’, यासंदर्भात विशेषत्वाने यात उल्लेख करण्यात आला आहे.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना ‘नरसंहाराचे कृत्य’ म्हणून जगाने मान्यता द्यावी !

आयोगाने भारत सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना ‘नरसंहार’ म्हणून स्वीकारावे.

आयोगाने अन्य मानवाधिकार संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारांनाही या अत्याचारांना ‘नरसंहाराचे कृत्य’ म्हणून अधिकृतपणे स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.