गुढीपाडवा हा भारतीय नव्या वर्षाचा प्रारंभ असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो; परंतु गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील काही पुरोगामी संघटना आणि काही बांडगुळ गुढीपाडवासारख्या सण-उत्सवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याचा संबंध औरंगजेबाने केलेल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येशी जोडून उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘छत्रपती संभाजीराजे यांची हत्या मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी केली आणि दुसर्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला होता’, असा आरोप करून हिंदु समाजात फुट पाडण्याचा, सामाजिक सलोखासुद्धा कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे, तर संभाजीराजे यांच्या हत्येचा संबंध गुढीपाडव्याशी जोडून आणि तर्कसंगत नसलेला इतिहास पसरवण्याचे अन् शिवशंभू भक्तांमध्ये दुही निर्माण करण्याचे षड्यंत्र, तसेच कटकारस्थान केले जाते. क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे यांची ११ मार्च १६८९ या दिवशी हत्या केली. त्याच काळात त्याने बंदा बैरागी यांचा क्रूर छळ केला. गुरुपुत्र फत्तेसिंग, जोरावरसिंग यांना जिवंतपणे भिंतीमध्ये गाढून हत्या केल्या होत्या. अनेक शीख बंधूंच्या क्रूर आणि निर्दयी हत्यासुद्धा केल्या आहेत.
१. छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येविषयी ब्रिगेडींनी केलेला खोटा प्रचार
‘छावा’ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा सत्य गौरवशाली इतिहास आणि बलीदान तरुणांना ज्ञात होऊन जागृती झाली. त्यामुळे इतिहासाशी सतत छेडछाड आणि अप्रामाणिकपणा करणार्या टोळ्या हादरल्या आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येचा संबंध मनुस्मृती आणि गुढीपाडवा यांच्याशी जोडून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसारमाध्यमांचा प्रचंड वापर करून खोटे साहित्य निर्माण केले. नाटकांचे प्रयोगसुद्धा करण्यात आले आहेत. ज्ञानेश महाराव, श्रीमंत कोकाटे, देशमुख, इंद्रजित सावंत, सुभानअली, भालचंद्र नेमाडे अशी मोठी सूची असलेली मंडळी कार्यरत आहेत. श्रीमंत कोकाटे यांनी तर ‘छत्रपती संभाजी महाराज’ पुस्तक प्रसिद्ध केले. त्या पुस्तकातील पान क्र. ५३ वर त्यांनी ‘छत्रपती संभाजीराजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले’ आणि ब्राह्मणांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजीराजे यांच्या हत्येच्या दुसर्या दिवशी ब्राह्मणांनी गुढ्या उभारणे, तोरणे उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा केल्याचा कांगावासुद्धा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काही चेलेचपाटे तोच खोटा इतिहास गुढीपाडव्याच्या निमत्ताने समाजात मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ही मंडळी ठरवून ‘गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे फाल्गुन अमावास्येला संभाजीराजे यांची हत्या मनुस्मृती संहितेनुसार करण्यात आली’, हा खोटा प्रचार करतात.
२. औरंगजेबाच्या आदेशानुसारच छत्रपती संभाजीराजे यांची करण्यात आली हत्या !
वास्तविक लेखक यदुनाथ सरकार यांच्या ‘औरंगजेब’ पुस्तकामध्ये ‘औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीराजे यांची हत्या झाली’, असे स्पष्ट होते. लेखक डॉ. श्री. जयसिंगराव पवार यांच्या ‘छत्रपती संभाजी, एक चिकित्सा’ या पुस्तकातील ‘छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या’ या प्रकरणात औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येसंबंधी सर्व ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ दिले आहेत, तसेच ‘मआसिर-ए-आलमगिरी’मध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहेत.
३. अफझलखान आणि निजामशाह यांनी केलेल्या हत्या कोणत्या मनुस्मृतीनुसार ?
अफझलखानाने हिंदु राजा कस्तुरी रंगा, राजे शहाजी पुत्र संभाजी यांची कनकगिरीच्या मोहिमेत तोफेच्या गोळ्याने छळकपट करून हत्या केली होती. छत्रपती संभाजीराजे यांचे पणजोबा आणि राजमाता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांचीसुद्धा २२ जुलै १६२९, म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी निजामशाहने क्रूर हत्या करून त्यांच्या देहाची विटंबना केली होती. जिजाऊ यांचे वडील लखुजी, भाऊ अचलोजी, रघुजी आणि भाचा यशवंतराव यांच्या निर्दयी हत्या केल्या आहेत. आता सांगा जाधव कुटुंबांच्या हत्या करतांना निजामाशाहने कोणती मनुस्मृती वाचली असेल ? किंवा कोणत्या ब्राह्मण कारकूनाने त्याच्या कानात हत्या करण्यास सांगितले असेल.
४. खोट्या इतिहासकारांनी प्रसारित केलेला चुकीचा आणि संभ्रम निर्माण करणारा इतिहास प्रतिवादाने खोडून काढणे आवश्यक !
लखुजी जाधव इथपासून छत्रपती संभाजीराजे यांनी सहन केलेल्या मरण यातना वा सोसलेला त्रास, झेललेले घाव, त्यांच्या देहाची झालेली विटंबना इथपर्यंत खोटे इतिहासकार विसरले असतील; पण या मातीवर आणि राष्ट्रपुरुषावर प्रेम करणारा महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे खोट्या इतिहासकारांपासून समाजाने सावध असणे, ही काळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या भूमीत इस्लामी आक्रमकांनी लखुजी जाधव, छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अनेक हिंदु विरांच्या हत्या केलेल्या आहेत. हिंदु समाजात दहशत निर्माण करण्यासाठीच हत्या करून देहाची विटंबनासुद्धा केली होती. हाच खरा इतिहास आहे; परंतु खोट्या इतिहासकारांनी चुकीचा आणि संभ्रम निर्माण करणारा इतिहास सतत प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचे शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास तरुणांसाठी सदैव प्रेरणादायक असून ‘छावा’ या हिंदी चित्रपटामुळे इतिहासाची उजळणी झाली आहे; पण आपलेच काही तथाकथित संभाजीभक्त इतिहासच पालटून तथा मोडतोड करून कमीपणा आणत आहेत. त्यामुळे तथाकथित संभाजीभक्तांचा कांगावा ओळखावा लागेल, तसेच हिंदु समाज फोडू पहाणार्या विद्रोही संघटनांचा प्रतिवादसुद्धा करावा लागेल.
– अशोक राणे, अकोला.