बाबरची हत्या !

संपादकीय

१५व्या शतकात मोगल आक्रमक बाबर याने अयोध्येतील श्रीराममंदिर उद्ध्वस्त करून तेथे त्याच्या नावाने मशीद उभारली होती. ती ५०० वर्षांनंतर हिंदूंच्या उद्रेकामध्ये वर्ष १९९२ मध्ये पाडली गेली. आता सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. गेल्या ५०० वर्षांत बाबर हा हिंदूंसाठी द्वेषाचा विषय होता; मात्र आता उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथील अशाच एका बाबरचा मुसलमानांकडूनच करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबर हा ‘हिंदूंचा पक्ष’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपचा समर्थक होता. यामुळेच त्याला त्याच्या धर्मबांधवांनी ठार केले. गेल्या ५०० वर्षांनंतर देशात झालेला हा पालट विचार करायला लावणारा आहे. या घटनेविषयी देशातील एकाही पुरो(अधो)गाम्याने, निधर्मीवाद्याने अथवा सर्वधर्मसमभावाचा प्रसार करणार्‍यांनी तोंड उघडलेले नाही. जरी त्यांनी उघडले, तरी ते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतील आणि भाजप सरकारला झोडपण्याचा प्रयत्न करतील, असेच एकंदरीत त्यांच्या मानसिकतेवरून वाटते. ज्यांनी बाबर याला मारहाण केली, त्याला घराच्या छतावरून खाली फेकले, ते त्याच्या धर्मबांधवांविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे नक्की; कारण काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये भादू शेख या तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याची पक्षातील गटबाजीतून गावठी बाँब फेकून हत्या करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या गटाने संबंधितांच्या घरांना आग लावली. यात ८ जण जिवंत जळून मृत पावले. मरणारे आणि मारणारे दोघेही मुसलमान समाजातील होते. त्यामुळे याविरोधात देशातील एकाही पुरो(अधो)गामी पक्ष अथवा नेता, संघटना, मानवाधिकार संघटना यांनी तोंड उघडले नाही. एरव्ही एखाद्या मुसलमानाला हिंदूंकडून मारहाण करण्यात आल्यावर आकांडतांडव करणारे एकजात सर्वजण गांधी यांच्या माकडांची भूमिका निभावत आहेत, हे देशातील जनतेला दिसून आले. म्हणजे ‘हे पक्ष, नेते, संघटना यांची मानसिकता किती ढोंगी आहे ?’, हे लक्षात येते.

बाबर याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भाजपचे स्थानिक आमदार पाठक यांनी मृतदेहाला खांदा दिला, हे लक्षात घ्यायला हवे. ‘भाजप मुसलमानांना निवडणुकीत उमेदवारी देत नाही. त्यांना मंत्रीपदे देत नाही’, अशा प्रकारचे आरोप अनेक ढोंगी पक्षांकडून नेहमीच केले जातात; मात्र ‘किती मुसलमान भाजपला समर्थन देतात ?’, ‘पक्षाचे कार्य करतात ?’ आणि ‘त्यांना त्यांच्या धर्मांतील किती लोक समर्थन देतात ? किंवा किती विरोध करतात ?’, हे वरील राजकीय पक्ष किंवा नेते किंवा संघटना कधीही सांगत नाहीत. बाबर याने भाजपचे समर्थन केले, विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यावर मिठाई वाटली, या रागातून त्याला त्याच्या धर्मबांधवांनी अमानुष मारहाण करून ठार केले. जर लोकशाहीमध्ये असे घडणार असेल, तर ‘ती निकोप आहे’, असे कसे म्हणता येईल ? ‘देशात लोकशाही टिकवायची आहे’, असे जे पक्ष नेहमीच सांगत असतात, ते अशा घटनांविषयी ‘ब्र’ही काढत नसतील, तर देशातील धार्मिक विद्वेष कसा दूर होणार ? काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स या मुसलमानांचे पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षांमध्ये हिंदु कार्यकर्ते, नेते आहेत. ते पक्षाची बाजू मांडत असतात; मात्र हिंदूंनी कधी त्यांच्यावर आक्रमण केले, असे झाले नाही, ही वस्तूस्थिती आहे, हे निधर्मीवादी का लक्षात घेत नाहीत ? बाबरची हत्या करून त्यांच्या धर्मबांधवांनी असाच संदेश दिला आहे की, भाजपचे समर्थन कुणी करत असेल, तर त्याची स्थिती अशीच होईल, असे म्हणावे लागेल. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता अशा मानसिकतेच्या लोकांना लोकशाहीचे धडे द्यावे लागणार आहेत. या वेळी ढोंगी मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांना किती साहाय्य करतील, हेही जनतेला दिसून येईल.