बंगालमध्ये आतापर्यंत सापडले ३५० हून अधिक गावठी बाँब

  • पोलिसांचे धाडसत्र चालूच !  

  • कालियाचक येथील बाँबस्फोटात ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बंगालमधील ही स्थिती राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची अपरिहार्यता स्पष्ट करणारी आहे ! – 

बीरभूम (बंगाल) – येथे काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्यांची बाँब फेकून हत्या झाल्यानंतर १२ घरे जाळण्यात आली. यात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बंगाल पोलिसांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर राज्यात धाडसत्र चालू केले आहे. यामध्ये गेल्या २४ घंट्यात ३५० हून अधिक गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. एकट्या बीरभूममध्येच २०० हून अधिक बाँब जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे पश्‍चिम मेदिनीपूर येथील कालियाचक भागातील एका घरात झालेल्या बाँबस्फोटात ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

१. पश्‍चिम मेदिनीपूरच्या केशवपूर येथून पोलिसांनी १०० गावठी बाँब जप्त केले. मालदा जिल्ह्याच्या एका गावातून ४ बाँब जप्त करण्यात आले. उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या जगदल पोलीस ठाण्याच्या सीमेतून ८ बाँब जप्त करण्यात आले, तर श्यामनगर प्रभाती संघ मैदानातून ३ जणांना अवैध शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे.

२. पूर्व बर्दवानच्या मेमारी आणि कृष्णपूर येथून ५ बाँब जप्त करण्यात आले आहेत. या वेळी पोलिसांनी २ जणांना अटक केली.

३. नादिया जिल्ह्याच्या कृष्णानगरातील छापेमारीत १४ गावठी बाँब जप्त करण्यात आले.

१३० रुपयांत मिळतो गावठी बाँब !

‘इंडिया टुडे’ने वर्ष २०२२ मध्ये एका शोधपत्रकारितेमध्ये गावठी बाँब बनवणार्‍या एका कारखान्याचा भांडाफोड केला होता. त्यात बंगालमध्ये अवघ्या १३० रुपयांना गावठी बाँब मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता.