विदेशी चलनाच्या गंगाजळीच्या टंचाईचा परिणाम !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत सध्या विदेशी चलनाच्या गंगाजळीची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच कागदांच्या टंचाईमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रहित करण्यात आल्या होत्या. कागदाच्या टंचाईमुळे आता देशातील दोन प्रमुख दैनिकांची छपाईही बंद करण्यात आली आहे. आता ही दैनिके केवळ ऑनलाईनच उपलब्ध असणार आहेत. सध्या श्रीलंकेच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीत अवघे १० ते १५ दिवस पुरेल इतकेच परकीय चलन शेष आहे. श्रीलंकेला पुढच्या वर्षभरात ६ अब्ज अमेरिकी डॉलर्स कर्जाची परतफेड करायची आहे. सध्या एका डॉलरचा भाव श्रीलंकेच्या २७५ रुपयांवर पोचला आहे.
इंधनाच्या दरात प्रचंड वाढ !
श्रीलंकेमध्ये सध्या पेट्रोल २५४ रुपये लिटर, तर डिझेल २१४ रुपये लिटर, साखर २०० रुपये, तर तांदूळ ५०० रुपये किलो, ४०० ग्रॅम दूध पावडरचा दर ९०० रुपये, तर चहाचा एक कप शंभर रुपये इतका दर झाला आहे. हा दर श्रीलंकेच्या रुपयांमध्ये आहे. श्रीलंकेचा एक रुपया म्हणजे भारताचे २७ पैसे आहे. पेट्रोल पंप आणि दुकाने यांपुढे रांगा लागल्या आहेत. रांगेत उभे राहून काहींचे जीव गेले आहेत. उपासमारीला कंटाळून उत्तरेकडील जाफना आणि मुन्नार या भागांतून नागरिक भारतात शरणार्थी म्हणून येऊ लागले आहेत.
सरकारच्या सेंद्रिय शेतीच्या निर्णयाचा परिणाम !
श्रीलंकेच्या या विपन्नावस्थेमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले संकट आले ते कोरोना महामारीमुळे. श्रीलंकेत मुख्य रोजगार पर्यटनातून मिळतो. कोरोनामुळे पर्यटन ठप्प झाले. दुसरे म्हणजे ‘श्रीलंका यापुढे रसायनमुक्त, विषमुक्त शेतीच पिकवेल आणि सेंद्रिय शेतमाल उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनेल’, असे आश्वासन राजपक्षे बंधूंनी वर्ष २०१९ च्या निवडणूक घोषणापत्रात दिले होते. त्यानुसार मे २०२१ मध्ये आदेश निघाला. सगळी शेती सरकारने सेंद्रिय बनवण्याचा निर्णय लागू केला. शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचा अनुभवच नव्हता. उत्पादन खर्च कितीतरी पट अधिक आणि उत्पादन निम्मे, अशी शेतकर्यांची अवस्था झाली. अडीच कोटी लोकांचे पोट भरणे कठीण झाले. पर्यटन उद्योग अडचणीत आल्याने अन्नधान्याच्या आयातीसाठी सरकारकडे पैसा नाही. अशा स्थितीत सेंद्रिय शेतीचा निर्णय अवघ्या ७ मासांत मागे घ्यावा लागला. सध्यातरी श्रीलंकेपुढे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.