मुख्यमंत्र्यांसह आदित्य, तेजस आणि रश्मी ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप !

ठाकरे परिवार आणि किरीट सोमय्या

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे, तसेच पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर ७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ‘अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग यांना या संदर्भात माहिती देऊ’, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ हे आस्थापन नंदकिशोर चतुर्वेदी आणि ‘ल्यूक बेनेडिक्ट’ यांना वर्ष २०१९ मध्ये विकले. यामध्ये ७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले.

या आस्थापनात नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ५६ टक्के हिस्सा आहे, तर ‘ल्यूक बेनेडिक्ट’ यांची ३४ टक्के भागीदारी आहे. इतरांचा १० टक्के हिस्सा आहे. या आस्थापनाच्या व्यवहारासाठी ७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा (मनी लॉड्रिंग) झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.