रशियाकडून मरियुपोल शहरातील तब्बल ९० टक्के इमारतींवर आक्रमण !

मरियुपोल रशियाच्या हाती लागू न देण्याविषयी युक्रेन ठाम !

रशियाच्या आक्रमणामुळे मरियुपोल शहरातील इमारतीची झालेली हानी

कीव (युक्रेन) – मरियुपोल शहर रशियाकडे कह्यात देण्याविषयी रशियाने दिलेला निर्वाणीचा इशारा युक्रेनने धुडकावला. ‘आम्ही आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे युक्रेनने सुनावले आहे. रशियामुळे मरियुपोल शहरातील तब्बल ३ लाख युक्रेनी जनता वीज, अन्न आणि पाणी या प्राथमिक सुविधांना मुकली आहे. ही परिस्थिती शहरातील लोकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे, असे युक्रेनचे खासदार दिमित्रो गुरीन म्हणाले आहेत. मरियुपोल रशियाच्या हाती लागू न देण्याविषयी युक्रेन ठाम असले, तरी तेथील परिस्थिती बिकट बनली आहे.

१. रशियाने युक्रेनी नागरिक आणि त्यांचे सैनिक यांना सुरक्षितपणे मरियुपोल सोडून जाता यावे, यासाठी त्यांनी शस्त्रे टाकावीत, असे आवाहन केले आहे; परंतु युक्रेन सरकारने रशियावर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हटले.

२. मरियुपोल शहरातील तब्बल ९० टक्के इमारतींवर आक्रमण करण्यात आले असून त्यांतील अनेक इमारती भुईसपाट झाल्या आहेत.

३. जर रशियाने मरियुपोल शहरावर नियंत्रण मिळवले, तर रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्रिमिया आणि रशिया यांचा थेट संपर्क होऊ शकणार आहे.

४. मरियुपोलनंतर ओडेसा या समुद्रकिनारी वसलेल्या युक्रेनी शहरावर रशिया आक्रमण करू शकते. यामुळे युक्रेनचा काळ्या समुद्राशी असलेला संबंध तुटणार आहे, असे मत युनायटेड किंगडमचे माजी सैन्यदलप्रमुख जनरल रिचर्ड बॅरन्स यांनी बीबीसीला सांगितले.

रशियाच्या क्षेपणास्त्राने राजधानी कीवचे १० मजली ‘शॉपिंग सेंटर’ केले उद्ध्वस्त !

रशियाच्या क्षेपणास्त्राने युक्रेनची राजधानी कीव शहरात असलेल्या एका १० मजली ‘शॉपिंग सेंटर’ला उद्ध्वस्त केले आहे.

या आक्रमणामध्ये ८ नागरिकांचा जीव गेला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. अनेक लोक या इमारतीमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध स्तरावर चालू आहेत, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.