बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांच्यासह मोगलांच्या विरोधात लढलेल्या मावळ्यांच्या बलीदानाने अन् त्यागाने पावन झालेली घोडखिंड ‘पावनखिंड’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सध्याच्या पिढीला या त्यागाचे स्मरण व्हावे, यादृष्टीने ‘पावनखिंड’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा प्रत्येक मोहिमेमध्ये प्राणपणाने लढत असे. त्यामुळे शत्रूपेक्षाही अल्पसंख्येने असलेले मावळे मोहीम जिंकायचे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी स्वत:चे उभे आयुष्य पणाला लावले होते, हे चित्रपट पाहून लक्षात येते. राजा कसा असावा, याचे सर्वाेत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! महाराजांचा जीव मावळ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचा असे. त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी मावळे सर्वस्वाची बाजी लावून लढत असत. महाराजांनी स्वराज्य तर मिळवले; पण त्यासमवेतच त्यांनी स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक कुटुंबाचेही दायित्व चोखपणे निभावले. त्यामुळे आताच्या शासनकर्त्यांनी चित्रपट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण यांतून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.
१. रयतेची माऊली असणार्या राजमाता जिजाऊ यांचा कृतज्ञताभाव !
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असतात, तर दुसरीकडे राजमाता जिजाऊ या बाजीप्रभु देशपांडे यांच्या घरी जाऊन त्यांची आई आणि पत्नी यांना भेटतात. त्यांनी त्यांचा मुलगा स्वराज्यासाठी दिला, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत असे. राजमाता जिजाऊंनी ठरवले असते, तर त्या राणी म्हणून आरामदायी जीवन जगू शकल्या असत्या; पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळेच त्या रयतेच्या माऊली झाल्या. आताच्या किती शासनकर्त्यांना देव, देश आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्यांविषयी कृतज्ञता वाटते ?
२. इंग्रजांचे मनसुबे ओळखून त्यांचा वेळीच बंदोबस्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज !
व्यापाराचे कारण काढून भारतात आलेल्या इंग्रजांचे लक्ष व्यापारापेक्षा राजकारणात अधिक होते. ‘इंग्रज लोक स्वराज्यासाठी त्रासदायक ठरू शकतात’, हे वेळीच लक्षात घेऊन त्यांचा बंदोबस्त केला. त्या काळी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले, ते आताच्या शासनकर्त्यांना कधी लक्षात येणार ? पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्या भारतियांना कधी कळणार की, अलंकार घालण्यास, कपाळाला कुंकू लावण्यास लाज वाटणे, सर्व प्रकारचे ‘डे’ साजरे करणे, नववर्ष १ जानेवारीला साजरे करणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे ! ‘पावनखिंड’ चित्रपट पाहून इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा निश्चय करावा.
३. मावळ्यांच्या पत्नींचाही त्याग मोठा असणे
छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी त्याग केलेले मावळे जसे हिरा होते, तसेच त्यांच्या पत्नी आणि आई यांचा त्यागही मोठा होता. मोहिमेवर गेलेला पती किंवा मुलगा जिवंत घरी येईल कि नाही, याची शाश्वती नसतांना काळजावर दगड ठेवून त्यांना निरोप देणारी पत्नी आणि आई महान होत्या. या माऊलींनी ठरवले असते, तर त्या सुखाधीन जीवन जगू शकल्या असत्या; परंतु काळाची आवश्यकता ओळखून शत्रूशी दोन हात करण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर राहून त्यांना त्यांच्या कर्तव्यात साथ देणार्या स्त्रियाही तितक्याच महान होत्या. आताच्या काळात केवळ स्वत:च्या सुखाचा विचार करणार्या स्त्रियांना या चित्रपटातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.
४. प्रत्येक मावळा म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीने प्रेरित झालेले तोफगोळेच !
सिद्धी जोहरच्या सैन्याला थोपवण्यासाठी घोडखिंडीमध्ये लढा देण्यासाठी थांबलेल्या मावळ्यांना बाजीप्रभु देशपांडे सांगतात, ‘‘शत्रूचे सैन्य पाहून घाबरून न जाता, खचून न जाता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करा. स्वराज्याच्या स्थापनेसाठी घामाच्या आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा.’’ ‘हर हर महादेव’च्या जयघोषात लढण्यासाठी सिद्ध झालेला प्रत्येक मावळा म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीने प्रेरित झालेले तोफगोळेच होते. ते एकाच वेळी शेकडो शत्रूंना नष्ट करू शकत होते. असे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद असावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीदेवीची अखंड उपासना केल्यानेच देवीचे आशीर्वाद त्यांचे आणि मावळ्यांचे वेळोवेळी रक्षण करत होते.
५. मावळ्यांचे बलीदान न विसरता आता गडदुर्गांचे रक्षण करणे आवश्यक !
स्वराज्यासाठी लढलेले बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांच्यासह असलेल्या मावळ्यांचे कर्तृत्व आणि बलीदान यांचे विस्मरण होऊ नये, असे हा चित्रपट पहाणार्या प्रत्येकाला नक्कीच वाटते अन् ते वाटायलाही हवे; मात्र या विचाराकडे दुर्लक्ष करू नका. छत्रपती शिवराय यांनी जिंकलेल्या गड-दुर्गांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकाचे आहे. सध्या विशाळगडासह अनेक गड-दुर्गांवर धर्मांध अनधिकृत बांधकामे करून ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा वैध मार्गाने विरोध करा. हिंदूंमध्ये याविषयी जागृती निर्माण करा. निद्रिस्त झालेला पुरातत्व विभाग आणि सरकार यांना जागे करण्याचे सामर्थ्य जागृत हिंदूंमध्ये आहे. प्राणाची बाजी लावणारे मावळे जसे इतिहासाच्या स्मरणात राहिले, तसे हिंदुत्व टिकवण्यासाठी वैध मार्गाने लढणार्या प्रत्येक हिंदूचे प्रयत्न इतिहासात सोनेरी अक्षरांनी नक्कीच कोरले जातील.
६. ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पहा !
सध्या प्रत्येक जण सुखाधीन जीवन जगण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे ‘मी, माझा संसार, माझे घर, माझे कुटुंबीय’ एवढेच आपले जीवन झाले आहे. हिंदूंचे होणारे धर्मांतर, प्रतिदिन लव्ह जिहादला बळी पडणार्या हिंदु स्त्रिया, राजरोसपणे होणारी गोहत्या, धर्मांधांची मंदिरांवरील आक्रमणे, गड-दुर्ग यांवरील वाढत चाललेली इस्लामी अतिक्रमणे अशा विविध संकटांनी हिंदूंना सिद्धी जोहरच्या विळख्याप्रमाणे वेढलेले आहे. हा विळखा तोडण्यासाठी ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपट निर्मितीचा उद्देश नक्कीच साध्य होईल.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर