Pakistan Attacks On Christians : पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाच्या आरोपावरून ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतातील सरगोधा येथील मुजाहिद वसाहतीमधील धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण केले. कुराणाचा अवमान केल्याच्या आरोप करत हे आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी संतप्त धर्मांध जमावापासून २ ख्रिस्ती कुटुंबांची सुटका केली. या प्रकरणी १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

नासिर नावाच्या एका ख्रिस्त्यासह दोघांनी कुराण जाळल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत तेथील मुसलमान समुदायाने परिसरातील ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण केले. या वेळी त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या तोडण्यात आल्या, तसेच घरातील वस्तूंना आग लावण्यात आली. नासिर याचा बुटांचा कारखाना असून त्यालाही आगीत ढकलण्यात आले. नासिरला मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्याची स्थिती अत्यवस्थ असून त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांसाठी कार्य करणारे राहत ऑस्टिन आणि महेश वासू यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला याविषयीची माहिती दिली. या घटनेचे अनेक व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये येत्या काही वर्षांत ख्रिस्ती आणि हिंदु यांचे अस्तित्व शेष राहील कि नाही ? अशी स्थिती आहे. याविषयी जगातील एकही देश बोलत नाही !