मुंबई – अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणात मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे नाव समोर आले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी गुन्ह्यामध्ये त्यांचे नाव नव्हते. पोलीस ठाण्याच्या स्तरावर अंगडियांकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर २३ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात तीन पोलीस अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांनी चौकशीत सौरभ त्रिपाठी यांचे नाव घेतले होते. त्यानंतर त्रिपाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासूनच त्रिपाठी हे बेपत्ता आहेत.
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले की, अंगडिया असोसिएशनने डिसेंबर २०२१ मध्ये मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकार्याकडे तक्रार केली होती. यात त्यांनी आरोप केला होता की, पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडिया यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी प्रतिमासाला १० लाख रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती.
त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई चालू
मुंबई पोलिसांनी त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, त्रिपाठी त्यांच्यावरील खंडणीच्या आरोपांच्या अन्वेषणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अंगडिया व्यापार्यांना तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्रिपाठी आणि अंगडिया व्यापार्यामधील संभाषणाचे ध्वनीमुद्रणही मुंबई पोलिसांना मिळाले आहे.