हिंगोली – जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पुनर्वसन केलेल्या गावांच्या भौतिक सोयी सुविधांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये १० कोटी २४ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला होता; परंतु या विकास कामात मोठा घोटाळा होत आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १७ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.
ते पुढे म्हणाले की, या कामाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्या नावे पत्रही पाठवले आहे. ईसापुर धरण निर्माण करत असतांना अनेक गावांना पुनर्वसन करावे लागले होते. त्याला २०-२५ वर्षे झाली आहेत. गावांच्या भौतिक सुविधांसाठी १० कोटी २४ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे; परंतु या कामात मोठा घोटाळा होत आहे, त्यामुळे चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिनकर कोकरे यांनी केली.
पुनर्वसन केलेल्या १०-१२ गावांमध्ये होत असलेल्या विकासकामांत मोठा घोटाळा होत आहे. जी कामे अगोदरच झाली आहेत, तीच कामे परत दाखवून, संमत निधी विकास कामाच्या नावावर दाखवून शासकीय मलिदा खाण्याचा प्रयत्न कंत्राटदार करत आहे. या कामाची चौकशी करा. यामध्ये तक्रारदाराने जिल्हाधिकारी आणि मला निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे, असे किरीट सौमय्या यांनी सांगितले.