सांगली, १८ मार्च (वार्ता.) – कसबे डिग्रज वाचन मंदिरास माधवनगरचे माजी उपसरपंच श्री. गोविंद परांजपे यांच्याकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले विविध विषयांवरील १३३ मोठे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. कसबे डिग्रज येथील ‘श्री माऊली ज्येष्ठ नागरिक संघा’चे अध्यक्ष श्री. वसंत दत्तात्रय दळवी यांनी वाचनालयाच्या वतीने हे ग्रंथ स्वीकारले. या वेळी ग्रंथपाल श्री. संदीप दिलीप कामेरीकर, तसेच सनातन संस्थेच्या साधिका सौ. शीतल जोशी उपस्थित होत्या.
ग्रंथांमुळे समाजामध्ये वाचन चळवळ वाढण्यासाठी साहाय्य होईल ! – संदीप कामेरीकर, ग्रंथपाल
या संदर्भात सनातन संस्थेला दिलेल्या अभिप्राय पत्रात ग्रंथपाल श्री. संदीप कामेरीकर म्हणतात, ‘‘हे ग्रंथ समाजातील प्रत्येक व्यक्तीला उपयोगी असून त्यामुळे समाजामध्ये वाचन चळवळ वाढण्यासाठी साहाय्य होईल.’’
कवठेएकंद (जिल्हा सांगली) येथील क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालयास जोग दांपत्याकडून सनातनच्या ग्रंथ मालिकेतील ग्रंथ भेट !
सांगली – कवठेएकंद (तालुका तासगाव) येथील क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालयास सनातनचे हितचिंतक श्री. व्यंकटेश जोग आणि त्यांच्या पत्नी सौ. मिनाक्षी जोग यांचेकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले २९ निवडक ग्रंथ भेट देण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजाराम कृष्णा माळी यांनी सदरचे ग्रंथ वाचनालयाच्या वतीने स्वीकारले. या वेळी उपाध्यक्ष श्री. सुहास कुलकर्णी, ग्रंथपाल सौ. सविता सुहास कुलकर्णी, तसेच सनातन संस्थेच्या साधिका सौ. शीतल जोशी उपस्थित होत्या.
‘आयुर्वेदानुसार आपले आचरण कसे असावे’ हा ग्रंथ पाहतांना विलक्षण समाधान वाटले ! – राजाराम माळी
घर, शाळा, ग्रंथालये यांतून सुसंस्कार मिळून समाजाची जडणघडण होत असते. त्यामुळे सनातन संस्थेचा हा सामाजिक उपक्रम आदर्श असून यातून सुसंस्कारित समाजाच्या निर्मितीसाठी साहाय्य होईल. हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त असून यातील ‘आयुर्वेदानुसार आपले आचरण कसे असावे ?’ या ग्रंथातील केवळ दोन-चार पृष्ठे चाळून विलक्षण समाधान वाटले, असे मत श्री. राजाराम माळी यांनी व्यक्त केले.
या वेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. सुहास कुलकर्णी यांनी सनातन संस्थेच्या नावे एक अभिप्राय पत्रक दिले आहे. या पत्रकात त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. या माध्यमातून मुलामुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासास चालना मिळेल, तसेच माणूस घडवण्यासाठी हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहेत, असे नमूद केले आहे.