बँकांतील प्रकरणांची माहिती घेऊन सीबीआयद्वारे चौकशी करण्यास मान्यता देण्यात येईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्यातील स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँक, अशा ५ बँकांच्या एकूण १२ प्रकरणांत १३ सहस्र २५७ कोटी रुपयांच्या अपव्यवहार आणि फसवणूक प्रकरणांची माहिती घेऊन सीबीआयद्वारे चौकशी करण्यास मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १६ मार्च या दिवशी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे. बँका ‘सीबीआय’ चौकशी करण्यास सांगत असतांना हे सरकार ती करण्यास अनुमती का देत नाही ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.