प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात विविध हिंदु संघटनांचे ध्येय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ असल्याचा पुनरुच्चार !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – मुंबई येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी २ दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच अधिवेशन घेण्यात आले. हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले, हे अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. भगवंताच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निश्चय उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केला. संतांची वंदनीय उपस्थिती आणि हिंदुत्वनिष्ठांची धर्मकार्याची तीव्र तळमळ यांमुळे अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मान्यवरांनी राष्ट्र-धर्म यांविषयी मांडलेले विचार १७ मार्च या दिवशी भाग १ मध्ये प्रसिद्ध केले होते. आज त्यापुढील भाग पाहूया.       (भाग २)

अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

हिजाबच्या विरोधामागे भारताच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

पोलीस विभागात नोकरी करणार्‍या मुसलमानाने ‘दाढी वाढवण्याचे स्वातंत्र्य असावे’, यासाठी न्यायालयात याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही विविध राज्यांत आणि त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात अशा प्रकारच्या याचिका पुन:पुन्हा करण्यात आल्या; मात्र कोणत्याही न्यायालयाने दाढी वाढवण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. तरीही पुन:पुन्हा अशा प्रकारच्या याचिका करण्यात येत आहेत. हिजाबच्या विरोधात रातोरात आंदोलन करून ‘हिजाबविना इस्लाम जिवंत राहू शकत नाही’, असे दर्शवण्याचा प्रयत्न मुसलमानांनी केला. हा भारताच्या इस्लामीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील अशा आघातांच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देऊ.

अधिवक्ता खुश खंडेलवाल

हिंदु युवकांनी कायदेशीरदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक अध्यक्ष, हिंदू टास्क फोर्स

सध्या देशात बौद्धिक युद्ध चालू आहे. डाव्या विचारांचे लोक हास्य कार्यक्रम, हिंदी चित्रपटसृष्टी यांद्वारे हिंदु धर्म आणि देवता यांवर टीका करून हिंदूंना संभ्रमित करत आहेत. धर्माचा अभ्यास नसलेल्या हिंदु युवकांना यातून लक्ष्य केले जात आहे. या आघातांच्या विरोधात लढा देण्यासाठी ‘हिंदू टास्क फोर्स’ युवकांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम करत आहे. धर्मकार्य करतांना ‘अध्यात्म’ हा केंद्रबिंदू ठेवायला हवा. ‘भगवान श्रीकृष्ण आपणाकडून सर्व करून घेत आहेत’, असा भाव ठेवायला हवा. यामुळे आपण आनंदाने कार्य करू शकू. कार्यात अपयश आले, तरी आपण हताश होणार नाही. ‘अपयशातूनही श्रीकृष्णाला काहीतरी शिकवायचे आहे’, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

अनेक खटल्यांत अडकवण्याचा प्रयत्न करूनही सनातनचे साधक प्रसन्न !

सनातन संस्थेला अनेक खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे; तरीही सनातनचे साधक नेहमी प्रसन्न असतात. सनातनचे साधक कधीही विचलित होत नाहीत, याचे कारण काय ? ‘साधना’ हेच आहे. त्यामुळे साधनेला केंद्रबिंदू ठेवून कार्य करायला हवे. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणार’, अशी संतांची भविष्यवाणी असल्यामुळे ते होणारच आहे. आपल्या पांडवांप्रमाणे कार्य करायला हवे. जेथे धर्म आहे, तेथे विजय निश्चित आहे.

सिद्धांत मोहिते

व्यापक मोहीम राबवल्यामुळेच फारूक मुनावर याला कार्यक्रम रहित करावे लागले ! – सिद्धांत मोहिते, संस्थापक, सॅफ्रन थिंक टँक

मुनावर फारुक या हास्य कलाकाराने त्याच्या कार्यक्रमातून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला. मुंबई येथे त्याचा ‘मुंबई टू नो वेअर’ हा कार्यक्रम दाऊदच्या जीवनावरील ‘मुंबई टू दुबई’ या पुस्तकातून प्रेरणा घेऊन करण्यात आला असल्याचे लक्षात आले. या विरोधात आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. याविषयी ‘ट्विटर ट्रेंड’ चालवण्यात आला. व्यापक मोहीम राबवल्यावर फारूक मुनावर याचे कार्यक्रम रहित करावे लागले. केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि एक वृत्तवाहिनी यांनी याला प्रसिद्धी दिली.

डॉ. अमित थडाणी

देवनिधीचा अपहार रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असणे आवश्यक ! – डॉ. अमित थडाणी, मुंबई

तिरुपती बालाजी मंदिरातील ६५ सहस्र कोटी रुपयांच्या हाराची चोरी झाली आहे, त्याऐवजी खोटा हार ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३ सहस्रांहून मंदिरांचे व्यवस्थापन पहाणार्‍या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अर्थात स्वतः सरकारने ३५ वर्षे आयकर भरला नव्हता. मंदिरांची शेकडो एकर भूमी गायब झाली आहे. काही भूमींवर खाणकाम केले जात आहे; परंतु त्याचे पैसे देवस्थान समितीला मिळत नाहीत. जे देवाला मानत नाहीत, अशांना श्री सिद्धिविनायक मंदिराच्या अर्पणातून पैसे दिले जात आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने पुष्कळ प्रमाणात देवनिधीचा अपव्यय होत आहे. हे रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असणे आवश्यक आहे.

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या कुटुंबियांची आपण काळजी घेतली पाहिजे ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय

अनेक निरपराध हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आले आहे. त्यांना आपण साहाय्य करू शकत नाही, तर किमान त्यांना फसवण्याचे काम तरी करू नये. कोणत्या हिंदुवत्वनिष्ठांवर अशी वेळ आली, तर त्यांच्या कुटुंबाची आपण काळजी घेतली पाहिजे.

वैद्य उदय धुरी

भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्रित लढा द्यायला हवा ! –  वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सरकारी कार्यालयात कामे लवकर होत नाहीत. न्यायालयात लाखो खटले प्रलंबित आहेत. गुरुकुलामध्ये शिक्षण झाल्यावर गुरुदक्षिणा दिली जात होती; मात्र सद्यस्थितीत शिक्षण चालू होण्यापूर्वीच शुल्क घेतले जाते. एकत्रित कार्य करून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला हवे. आपणाला स्वराज्य मिळाले आहे; मात्र आता सुराज्य प्राप्त करायला सिद्धता करायला हवी.

दीप्तेश पाटील

भगवंताला शरण जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायला हवे ! – दीप्तेश पाटील, समन्वयक, हिंदू गोवंश रक्षा समिती

वसई, विरार, मीरारोड येथे मोठ्या प्रमाणात गोमांस येते. समाजात श्वानप्रेमी आहेत; परंतु गोप्रेमी नाहीत. वसई, विरार येथे गोरक्षक रस्त्यावर येऊन कार्य करत आहेत. काही गोरक्षकांवर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. नि:स्वार्थ भावाने सेवा करतांना कठीण प्रसंग येतात. त्यासाठी भक्तीमार्गाने भगवंताला शरण जाऊन कार्य करायला हवे. कठीण प्रसंग आल्याविना हिंदु राष्ट्राची स्थापना करता येणार नाही. अशा संकटकाळात न डगमगता एकत्रपणे कार्य करायला हवे.

संतोष वर्तक

हिंदु राष्ट्र निर्मितीचा प्रारंभ स्वत:च्या घरातूनच केला पाहिजे ! – संतोष वर्तक, हिंदुत्वनिष्ठ

माझ्या शिकवणीतील प्रत्येक विद्यार्थी राष्ट्र आणि धर्म प्रेमी आहे.  ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई, वडील आणि देव यांना नमस्कार करावा’, असा संकल्प मी शिकवणीतील विद्यार्थ्यांकडून करून घेतला आहे. प्रत्येक रविवारी मी ग्रंथवाचनाचा कार्यक्रम ठेवतो. हिंदु संस्कृतीचे आचरण करण्यास सांगतो. हिंदु संस्कृतीनुसार आचरण केल्याविना आपण हिंदु राष्ट्र स्थापन करू शकत नाही. हिंदु राष्ट्र निर्मितीचा प्रारंभ स्वत:च्या घरातूनच केला पाहिजे.

मोतीलाल जैन

हिंदूंमधील हिंदुत्वाची भावना जागृत करायला हवी ! – मोतीलाल जैन, श्री श्वेतांबर भूमीपूजन जैन संघ, पनवेल

मुसलमानांचे वर्चस्व वाढते, तेव्हा ते अन्य धर्मियांना हाकलून लावतात. भारतात मुसलमानांची संख्या वाढल्यास ते हिंदूंना हाकलून देतील. यासाठी हिंदूंमधील हिंदुत्वाची भावना आपणाला जागृत करायला हवी.

प्रभाकर भोसले

संघटित होऊन हिंदूंनी स्वत:चा दबावगट निर्माण करायला हवा ! – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)

धर्महानी, राष्ट्रपुरुषांचा अवमान यांविरोधात आंदोलनासाठी हिंदू अनुमती मागण्यास गेल्यावर मान्यता देण्यास पोलीस टाळाटाळ करतात. अन्य धर्मियांचे मात्र पोलीस ऐकून घेतात. यासाठी संघटित होऊन हिंदूंनी स्वत:चे दबावतंत्र निर्माण केले पाहिजे. आंदोलन केल्याने हिंदूंमध्ये जागृती निर्माण होणार आहे.

सुधीर साळवी

अजानविरोधातील लढ्यात संघटितपणे कार्य करणे आवश्यक ! – सुधीर साळवी, शिवसृष्टी असोसिएशन

दिवसातून ५ वेळा होणार्‍या कर्णकर्कश अजानमुळे आपल्या साधनेत व्यत्यय येतो. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपक यंत्रणेविषयी घालून दिलेल्या नियमांचे यात उल्लंघन होत आहे. कुर्ला परिसरात याविषयी विविध स्तरांवर प्रयत्न करूनही अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आता न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

उल्हास वडोदकर

शिक्षणात अध्यात्माचा समावेश आवश्यक ! – उल्हास वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

इंग्रज येण्यापूर्वी भारतातील शिक्षणपद्धती अतिशय उत्तम होती. सध्याची शिक्षणपद्धती केवळ क्षमता विकसित करते. हिंदुत्वाच्या शिक्षणपद्धती व्यक्तीला विकसित करते. यासाठी शिक्षणात अध्यात्माचा समावेश करणे आवश्यक आहे.

डॉ. प्रमोद भोईर

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य एकत्रितपणे करूया ! – डॉ. प्रमोद भोईर, भूमीपुत्र संघर्ष समिती, भिवंडी

हिंदूंना कुठेही आसरा नाही. सर्वत्रच्या हिंदूंच्या समस्या सारख्याच आहेत. हिंदूंना आंदोलन करण्यासाठी, सभा घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो, हे पाहून आपण पारतंत्र्यात तर नाही ना ? असे वाटते. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना हीच उपाययोजना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य एकत्रितपणे करूया.

धर्मप्रेमींचे साधनेविषयीचे अनुभव

श्री. रोहिदास शेडगे, उपसरपंच, दिघाटी, पेण, रायगड

सनातनच्या साधकांनी केलेल्या संपर्काच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितल्यावर मी कुलदेवतेचा नामजप चालू केला. सनातनची सात्त्विक उत्पादने वापरण्यास प्रारंभ केला. त्यामुळे नामजपामुळे माझ्या वाईट सवयी सुटल्या. साधनेला प्रारंभ केल्यावर समाज, निसर्ग यांविषयीही कृतज्ञता वाटायला लागली. समाजाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन पालटला आहे.

अधिवक्ता मुरलीधर क्षीरसागर, बोईसर

मी कुलदेवता, दुर्गादेवी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा नियमित बसून नामजप करतो. काम करतांना एकाग्रता रहात नाही. नामजप वाढल्यानंतर हा त्रास न्यून झाला आहे. आता भीती वाटत नाही. सकारात्मक रहाता येते. देवाचे अधिष्ठान असेल, तर कुठेही अडचण येत नाही. साधना केल्यावर हा अनुभव सर्वांना येईल.

 (समाप्त)