स्वरक्षणासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शीतल चव्हाण, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवतांना समितीचे कार्यकर्ते

मुंबई – दैनंदिन जीवनात वावरतांना महिलांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळेस सुरक्षेसाठी अन्यांवर अवलंबून न रहाता अशा प्रसंगांना कणखरपणे तोंड देण्यासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कु. शीतल चव्हाण यांनी येथे केले. त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सध्याची परिस्थिती पहाता भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी देशात अंतर्गत अस्थिरता वाढू शकते. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आपण सिद्ध राहिले पाहिजे. धर्मशिक्षणामुळे शौर्यजागृती होईल आणि प्रशिक्षणामुळे शारिरीक आणि मानसिक बळ मिळेल.

या वेळी समितीचे श्री. हेमंत पुजारे आणि कु. सिद्धी बाळे यांनी कराटे, दंड साखळी आणि काही प्रसंगाच्या माध्यमातून स्वरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. २५ महिला या वेळी उपस्थित होत्या. निवृत्त न्यायाधीश रमा विजय सावंत वाघुले यांच्या हस्ते कु. शीतल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.