राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या ध्येयाने झपाटले पाहिजे ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास हांडे महाराज

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास हांडे महाराज

चिपळूण, १२ मार्च (वार्ता.) – सात्त्विक ध्येयाविना मानवी जीवन निरर्थक आहे. ध्येयवाद असेल, तर ईश्‍वरी सत्तेची अनुभूती कुणालाही घेता येते. अशी अनुभूती संत सावता माळी यांनी शेतीच्या कामातून घेतली. सद्य:स्थितीत समाज उठल्यापासून झोपेपर्यंत व्यावहारिक कार्यात आणि निरर्थक चर्चेत दिवसच्या दिवस घालवत आहे; मात्र राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. संत सात्त्विक ध्येयवादाने झपाटले होते. राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या ध्येयाने आपणही झपाटले पाहिजे, असे प्रतिपादन राजगड, पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांनी केले.

महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत अध्यक्ष कर्मवीर ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या निवासस्थानी झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या वेळी आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. कोकरे महाराज यांना समाजातील विविध स्तरांतील मंडळींनी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे आणि सनातन संस्थेचे श्री. केशव अष्टेकर यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कीर्तनातून ह.भ.प. हांडे महाराज म्हणाले की,

१. संत नामदेव महाराज यांनी ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।’ या त्यांच्या अभंगातून भगवंताकडे अशी मागणी केली की, ‘जे धर्मपरायण आहेत, ज्यांनी धर्माचे पालन करण्यासाठी, राष्ट्ररक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, त्यांना मायेची बाधा होऊ देऊ नका. त्यांच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे.’

२. आठशे वर्षांची मोगलांची गुलामगिरी, ५ पातशाह्यांचे पाशवी अत्याचार आणि अन्याय चालू असतांना १४ ते २० वयोगटांतील ध्येयवादाने झपाटलेल्या मावळ्यांना घेऊन बाल शिवाजीने रायरेश्‍वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ३६ वर्षांत अशक्य ते शक्य करून दाखवले. अशा  मावळ्यांच्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य साकारलेल्या महाराष्ट्रात सद्य:स्थितीत नेमके काय चाललंय?

२. सध्या हिंदु समाज दुसर्‍यांच्या प्रथांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो. लावलेला दिवा फुंकून वाढदिवस साजरा करणे, ही आपली संस्कृती नव्हे. हिंदु संस्कृतीत दीपप्रज्वलन करतात.

ह.भ.प. हांडे महाराजांनी केली समितीच्या कार्याविषयी विचारपूस !

ह.भ.प. रोहिदास हांडे महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे आणि सनातन संस्थेचे श्री. केशव अष्टेकर यांनी भेट घेतली आणि त्यांना वर्ष २०२२ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले. या वेळी ह.भ.प. हांडे महाराजांनी समितीच्या कार्याविषयी आणि सनातनच्या साधकांविषयी प्रेमाने अन् आस्थेने विचारपूस केली.