‘रत्नाताई (सुश्री (कु.) रत्नमाला दळवी) संत कधी बरे होणार ?’ असे अनेक दिवस साधकांना वाटत असतांनाच ‘वर्ष गेले, मास गेले, साधकांनी मोजले दिवस…रात्री संपल्या, सकाळ गेल्या, उजाडला आजचा हा शुभदिवस…’ अशी वेळ फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्थीला, म्हणजे ६ मार्च २०२२ या दिवशी आली आणि सर्वांची रत्नाताई ‘पू. रत्नाताई’ झाली ! सर्वांसाठी हर्षभराचा असणारा हा मंगलक्षण आला आणि साधकांची प्रतीक्षा संपली…! देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी काव्यसुमनांच्या माध्यमातून सुश्री (कु.) रत्नमाला दळवी सनातनच्या संत झाल्याचे गुपित अखेर उलगडले…! या वेळी परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) शब्दपुष्परूपी संदेश त्यांनी वाचून दाखवला. गुरुदेवांची कृपा अनुभवतांना उपस्थित सर्वांची मने गुरुदेवांप्रतीच्या कृतज्ञतेने ओथंबून गेली…! या घोर आपत्काळात जगताला चैतन्य देण्यासाठी गुरुमाऊलीने सिद्ध केलेल्या सनातनच्या संतमेळ्यात आणखी एका संत‘रत्ना’ची भर पडली ! भवसागरातून भावसागराकडे नेणार्या गुरुमाऊलीच्या कृपावर्षावात न्हाऊन निघालेले हे चैतन्यमयी भावक्षण साधकांनी त्यांच्या भावविश्वात साठवून ठेवले !
शांत, स्थिर, आनंदी स्वभावाच्या आणि परिपूर्ण सेवा करणार्या देवद आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) !‘मूळच्या तिवरे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) वर्ष २००३ पासून सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत. अध्यात्मात सर्वांत महत्त्वाचे असते, ते म्हणजे समजलेली साधना कृतीत आणणे ! सुश्री (कु.) रत्नमाला यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या साधनाप्रवासात ही गोष्ट उत्तमप्रकारे साध्य केली. गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यावर त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधना यांची सुरेख सांगड घातली. यातून त्यांचा ‘आज्ञापालन’ हा गुण लक्षात येतो. सुश्री (कु.) रत्नमाला यांच्यातील सेवाभावी वृत्ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अनेक शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावपूर्ण, परिपूर्ण आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून सेवा करतात. त्या सध्या देवद आश्रमात सेवा करत आहेत. ‘दिसेल ते कर्तव्य’ असा त्यांचा भाव असून आश्रमातील अन्य सेवाही त्या पुढाकार घेऊन करतात. ‘आधी केले, मग सांगितले’, ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सहसाधकांवर व्यष्टी साधना आणि परिपूर्ण सेवा यांचे महत्त्व बिंबवले आहे आणि त्या सर्वांकडून उत्तम प्रकारे साधना करून घेत आहेत. शांत, स्थिर, अंतर्मुख, सेवेची तळमळ आदी ‘गुणरत्नांची माला असलेल्या’ सुश्री (कु.) रत्नमाला यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१३ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूचा फेरा पार केला. आजच्या या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या ११८ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. ‘पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.३.२०२२) |
… असा झाला भावसोहळा !
सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या या भावसोहळ्याला आरंभ झाल्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) विश्वव्यापी समष्टी कार्यात प्रकृती, कौशल्य, वय, क्षमता आणि मर्यादा आदींनुसार आबालवृद्ध, सेच आजारी साधक यांच्यासाठी समष्टी सेवा उपलब्ध आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती त्याहूनही अधिक साधना अन् सेवा मार्ग’ असेच जणू झाले आहे. विविध प्रकारच्या सेवा करतांना साधकांना येणार्या अडचणी सुश्री (कु.) रत्नमालाताई सोडवते, त्यांचे नियोजन करून देते, इतकेच नव्हे, तर त्यांच्या समष्टी सेवेसमवेतच त्यांच्याकडून व्यष्टी साधनाही करवून घेते. त्यामुळेच ती विविध प्रकारच्या सेवा करणार्या साधकांचा आधार झाली आहे !’’
पू. (सौ.) अश्विनीताईंनी प्रथम आश्रमातील साधकांना त्यांचे सेवेतील अनुभव सांगण्यास सांगितले. साधक अनुभव सांगत असतांनाच ‘सुश्री (कु.) रत्नमालाताईंचे त्यांना साहाय्य कसे मिळते’, हे लक्षात आले. त्यानंतर ‘सुश्री (कु.) रत्नमालाताई साधकांना कशा प्रकारे साधकांना साहाय्य करतात ?’ याविषयी पू. (सौ.) अश्विनीताईंनी त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या गुणरत्नांचा खजिना अलगदरित्या समोर आणला !
पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई या तर गुणरत्नांची खाण… !
व्यापकत्व
(सुश्री (कु.)) रत्नमालाताई या प्रश्नोत्तराच्या वेळी म्हणाल्या, ‘‘आश्रमातील अन्य सेवाही मला माझ्याच वाटतात. मी स्वतः ती करू शकले नाही, तरी साधकांच्या समष्टी सेवेचे नियोजन करून देणे, हे मला माझे दायित्व वाटते. गुरुदेवांना साधकांनी नामजपाकडे दुर्लक्ष केलेले आवडणार नाही. त्यामुळे साधकांचे नामजपादी उपाय कसे होतील ? हे मी पहाते.’’
त्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘यातून (सुश्री (कु.)) रत्नमालाताईंचे ‘व्यापकत्व’ लक्षात येते. ‘गुरूंना काय अपेक्षित आहे’, हे ओळखून त्या सेवा करतात.’’
कर्तेपणा अर्पण करणे
‘‘आश्रमात साधकसंख्या अल्प असतांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचे नियोजन करणे, तसेच अत्यंत शारीरिक त्रासांतही सहजतेने सेवा करणे, हे कसे काय साध्य होते ?’’, असा प्रश्न पू. (सौ.) अश्विनीताई यांनी विचारल्यावर (सुश्री (कु.)) रत्नमालाताई म्हणाल्या, ‘‘सर्व सेवा देवच करून घेत असतो आणि घेणार आहे’, असा माझा भाव असतो.’’
त्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘कर्तेपणा नाहीसा होत चालला आहे’, असेच यावरून लक्षात येते.’’
सेवेविषयी आपलेपणा, देहबुद्धी अल्प असणे, गुरूंना अपेक्षित असे करण्याची तळमळ, ‘सर्व काही गुरुच करत आहेत’, असा अपार भाव यांसह अन्य गुणगंधाचा सुगंध सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या पू. (सौ.) अश्विनीताई यांनी उलगडलेल्या पुढील काव्यरूपी गुणवैशिष्ट्यांतून दरवळला !
गुरुसेवेची तीव्र तळमळ आहे तिच्या मनी ।
अनेक सेवांचे दायित्व ती लीलया सांभाळी ।। १ ।।
स्थिरता, सहजता, नम्रता अन् तत्त्वनिष्ठता ।
या दिव्य गुणरत्नांची ती गुंफतसे माळा ।। २ ।।
सातत्य, चिकाटी, परिपूर्णता या अनेक गुणांचा साज ।
तिच्या साधनेचा ‘लेखा’ मांडे भगवंत आज ।। ३ ।।
गुणांची करूनी बेरीज, केली दोषांची वजाबाकी ।
गुणाकार भक्ती-प्रीतीचा, अंतरात कृतज्ञता बाकी ।। ४ ।।
वर्षाअखेरी असा साधनेचा लेखा जुळला ।
अनेक गुणरत्नांची माला झाली ‘पू. रत्नमाला’ ।। ५ ।।
संतपद घोषित झाल्यानंतर पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी व्यक्त केलेले मनोगत !गुरुदेवांनी मला पुढील सेवेसाठी पुष्कळ मोठे दायित्व दिले ! – पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी‘गुरुदेवांनी मला पुढील सेवेसाठी पुष्कळ मोठे दायित्व दिलेले आहे’, असे वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच मला साहाय्य करणारे सर्व साधक यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. आज जे काही दिले आहे, ते १०० टक्के परात्पर गुरुदेवांनीच दिले आहे. यामध्ये माझे प्रयत्न काडीमात्रही नाहीत.’’ पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांनी दिलेला संदेश !पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांचा कृतज्ञताभाव दाटून आल्यामुळे त्यांना अधिक बोलता आले नाही. या वेळी साधकांना संदेश देतांना त्या म्हणाल्या, ‘‘साधकांनी गुरुदेवांना अपेक्षित अशी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांच्या समष्टी कार्यात अधिकाधिक योगदान दिले पाहिजे.’’ |
संतसन्मानाचा अलौकिक क्षण कृतज्ञतेच्या भावाश्रूंनी साजिरा झाला !
या वेळी (सुश्री (कु.)) रत्नमालाताई ७१ टक्के पातळी गाठून सनातनच्या ११८ व्या संतपदी विराजमान झाल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन पू. (सौ.) अश्विनीताई यांनी केले. त्यानंतर पू. (सौ.) अश्विनीताई यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. त्यांना भेटवस्तू दिली अन् त्यांना आलिंगन दिले ! या भावभेटीनंतर पू. (सौ.) अश्विनीताई यांनी पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना वंदन केले. त्यानंतर पू. (सौ.) अश्विनीताई यांचा भाव जागृत झाला. या वेळी पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांचा कृतज्ञताभाव दाटून आला आणि काही काळ तो तसाच होता !
यानंतर पू. रमेश गडकरी, पू. शिवाजी वटकर, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. उमेश शैणे यांनी पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्याविषयीचे गुणगौरवपर अनुभव सांगितल्याने साधक अधिकच भावविभोर झाले !
भावसोहळ्याला उपस्थित सद्गुरु आणि संत !
सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. (श्रीमती) निर्मला दाते, पू. बलभीम येळेगावकर, पू. दत्तात्रेय देशपांडे, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. उमेश शेणै, पू. शिवाजी वटकर आणि पू. रमेश गडकरी
या वेळी देवद आश्रमातील पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या सेवेशी संबंधित असणारे साधक उपस्थित होते, तसेच मिरज येथील सनातनच्या आश्रमातील त्यांच्या सेवेशी संबंधित काही साधक ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
या सोहळ्याला पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांचे मोठे भाऊ श्री. वसंत दळवी, वहिनी सौ. वैभवी दळवी आणि भाची कु. नयना दळवी हे संगणकीय प्रणालीद्वारे जोडलेले होते.
संतपद घोषित केल्यावर मला परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व अनुभवता येत होते. – पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई |
‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’ ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील पंक्ती तंतोतंत कृतीत आणणार्या पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई !
पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताईंना कमरेचा तीव्र त्रास असल्याने त्यासाठी पट्टा लावावा लागतो. उजव्या हाताची स्थिती नाजूक झाल्याने त्यांनी डाव्या हाताने संगणकाचा ‘माऊस’ चालवणे शिकून घेतले. संगणकाशी संबंधित सेवा असूनही त्यांना संगणकावर अधिक वेळ सेवा करणे शक्य होत नाही. तरीही पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या मुखमंडलावर कधीही या तीव्र शारीरिक त्रासांचा ताण दिसत नाही किंवा त्यासाठी त्यांनी कधी अधिक वेळ विश्रांती घेतली आहे, असेही झाले नाही ! गुरुदेवांच्या या कृपेविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्या म्हणाल्या, ‘‘शारीरिक त्रास होत असूनही सेवेला आरंभ केल्यावर त्रास कधी नाहीसा होतो, ते लक्षातही येत नाही !’’ सेवेच्या तीव्र तळमळीमुळे ही अनुभूती गेली काही वर्षे सातत्याने घेत असलेल्या पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्यासी जोडा ।’ ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील पंक्ती प्रत्यक्षात जगत असल्याचे लक्षात आले आणि साधनारत असलेल्या सर्वांसाठीच ते प्रेरणादायी ठरले !
संतपद घोषित केल्यावर पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांनी अनुभवलेली भावावस्था !
संतपद घोषित केल्यानंतर ‘पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी हात हातात घेतल्यावर ‘देवाने मला त्याच्या चरणांशी घेतले’, असे वाटून पुष्कळ भावजागृती झाली. आतून आनंदाचे कारंजे बाहेर पडत होते. सोहळा माझा असला, तरी ‘अन्य कुणाचा तरी सोहळा अनुभवत आहे’, असे वाटत होते. चार घंट्यांहून अधिक घंटे बसूनही सोहळा संपल्यानंतर अधिक शारीरिक त्रास जाणवला नाही’, असे पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांनी सांगितले.
पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
केवळ आमच्या उद्धारासाठीच आम्हाला रत्नमालाच्या सहवासात ठेवले आहे ! – वसंत दळवी (पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांचे मोठे भाऊ), तिवरे (जिल्हा रत्नागिरी)
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी संतपदी विराजमान झाल्याचे समजल्यानंतर ‘आजचा क्षण केवळ गुरुदेवांमुळेच अनुभवायला मिळत आहे’, असे वाटून त्यांचे भाऊ श्री. वसंत दळवी यांचा कृतज्ञताभाव दाटून आला. या वेळी त्यांनी पू. रत्नमाला यांच्या जीवनातील २० वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला. श्री. वसंत दळवी म्हणाले, ‘‘वर्ष २००२ मध्ये पू. रत्नमालाच्या हृदयाच्या झडपेला छिद्र आहे’, असे आधुनिक वैद्यांकडून समजले. अनेक आधुनिक वैद्यांनी ‘काहीही केले, तरी ती वाचणार नाही’, असे सांगितले होते. त्या वेळी आम्ही याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही तिचे शस्त्रकर्म करा. नंतर आश्रमात येऊन १५ दिवस रहा आणि मग घरी जा.’’ आम्ही त्याप्रमाणे केले. पू. रत्नमाला जिवंत असणे, ही गुरुदेवांचीच कृपा आहे. त्याच वेळी तिचे आयुष्य संपले होते; पण गुरुमाऊलींनीच तिला वाचवले आणि तिची साधना करवून घेतली. केवळ आमचा उद्धार करण्यासाठीच गुरुदेवांनी आम्हाला तिच्या सहवासात ठेवले. हे आमचे भाग्यच आहे. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’’
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला यांच्या वहिनी सौ. वैभवी दळवी यांना ही शुभवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाल्याने त्या काही बोलू शकल्या नाहीत.
आत्या ही कुटुंब आणि घर यांमध्ये अडकलेली नाही ! – कु. नयना दळवी (पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला यांची भाची), कोल्हापूर
आत्या संतपदी विराजमान झाल्याचे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. आम्ही प्रत्यक्षात सोहळ्याला उपस्थित नसलो, तरी ‘गुरुदेवांमुळे आम्ही तेथेच उपस्थित आहोत’, असे वाटते. मी लहान असल्यापासून आत्या पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात गेल्यामुळे मला तिचा प्रत्यक्ष सहवास अल्प मिळाला. तरीही तिच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आत्या ही कुटुंब आणि घर यांमध्ये अडकलेली नाही. सणांच्या वेळी इतर साधकांना घरी जायचे असते; म्हणून ती घरी येत नाही. सण झाल्यानंतर येते. घरी आल्यावरही ती सेवाच करते. सेवा करण्याची तिची तळमळ पुष्कळ असल्यामुळे शारीरिक त्रास होत असला, तरी ती आडवी पडून सेवा करते.
तिची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. ‘आपली प्रत्येक कृती इतरांना आनंद देणारी असायला हवी’, असा तिचा भाव असतो. त्यामुळे सेवेच्या व्यस्ततेतूनही आजी-आजोबांना (पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला यांचे आई-वडील यांना) संपर्क करून ती त्यांची विचारपूस करते.
तिवरे (जिल्हा रत्नागिरी) येथे वास्तव्यास असणार्या पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांच्या आई सौ. शोभना दळवी आणि वडील श्री. दत्ताराम दळवी यांनी ही शुभवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाल्याचे कळवले.
विशेष
भावसोहळ्याचे सूत्रसंचालन ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या सौ. तनुजा गाडगीळ यांनी अत्यंत मधुरवाणीतून भावपूर्णरित्या केले. त्यांनी घेतलेल्या भावप्रयोगांमुळे सर्व साधकांना श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता येत होते. भावप्रयोग सांगतांना त्यांचा भाव दाटून येत होता. सोहळ्यात मधे मधे भावपूर्णरित्या घेतलेल्या भावप्रयोगांमुळे वातावरणातही भावतरंग जाणवत होते.
भावसोहळ्यानंतर पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई यांनी पू. (श्रीमती) दातेआजी यांचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर सद्गुरु आणि संत यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. भावसोहळ्याची समाप्ती करतांना पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘संत तुकाराम महाराजांना संतांमध्ये देव दिसतो. त्यांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये दगडाचा देव आहे आणि पाण्याचे तीर्थ आहे. संतांमध्ये राहून एकदा पाप नाहीसे झाले की, मग जीवनातील त्रिविध तापही नाहीसे होतात. संत हे त्यांच्या सत्संगाने मनुष्याच्या दुष्प्रवृत्तींना पालटून टाकतात. सनातन ही संतांची मांदियाळी आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने असे संत आपल्याला पहायला मिळतात, त्यांची सेवा करायला मिळते, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.’’
पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई संतपदी विराजमान झाल्यानंतर सुचलेली कविता
रत्नागिरीचे ‘रत्न’ संतपदी विराजमान झाले ।
‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’
हे संतवचन कृतीत आणले ।। १ ।।
शारीरिक व्याधींवर मात करूनी झोकून देऊन केली सेवा ।
जीवनाचे सार्थक केले गुरूंच्या कृपेने काही वर्षांतच त्यांनी ।। २ ।।
सहजता, नम्रता, प्रेमभाव, निर्मळता
आणि तत्त्वनिष्ठता असे त्यांचा स्थायीभाव ।
अशा पू. रत्नमालाताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ।। ३ ।।
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |