पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू पराभूत !

पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

अमृतसर – पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा पराभव झाला आहे. शिरोमणी अकाला दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि पक्षाचे नेते विक्रमजित सिंह मजिठिया हेही पराभूत झाले आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांनी पराभवानंतर ट्वीट करून म्हटले, ‘लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारतो. आम आदमी पक्षाचे अभिनंदन.’

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह

काँग्रेसच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आणि आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणारे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पतियाळा मतदारसंघातून १९ सहस्रांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. मागील निवडणुकीत ते ५२ सहस्र मतांनी विजयी झाले होते.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

उत्तराखंडमधील भाजपचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा पराभव झाला आहे. खटीमा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भुवन कापडी यांनी धामी यांचा ६ सहस्र मतांनी पराभव केला.

उत्तराखंडमधील काँग्रेसचे नेते हरीश रावत पराभूत !

उत्तराखंडमधील काँग्रेसचे नेते हरीश रावत

उत्तराखंडमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे राज्यातील लाल कुआ मतदारसंघातून १० सहस्र मतांनी पराभूत झाले आहेत.

पराभवापूर्वीच प्रियांका वाड्रा यांचा कार्यकर्त्यांना संदेश !

‘आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे !’

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा

उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नाही, हे मतदानोत्तर चाचणीतून उघड झाले होते. याच अनुषंगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटद्वारे संदेश दिला. त्यात त्यांनी लिहिले, ‘राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतांनाही तुम्ही ज्या प्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटीबद्ध राहिलात, याचा मला फार अभिमान आहे. जनादेशाचा आदर करत देश आणि राज्याप्रती निष्ठा अन् समर्पण भावनेने लढा चालू ठेवण्याची सिद्धता आपल्याला करावी लागेल. आपला लढा नुकताच चालू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे.’