विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांविषयी आज ‘दूध का दूध, पानी का पानी’ करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप करत ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सादर केली होती. याविषयीचा ‘पेनड्राईव्ह’ही त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या स्वाधीन केला. महाविकास आघाडी सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न विशेष सरकारी अधिवक्त्यांकडून आणि नेते मंडळी यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप त्यांनी सभागृहात केला होता. याविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर १० मार्च या दिवशी विधानसभेत सविस्तर उत्तर देणार असून मी दिलेल्या उत्तरानंतर ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाईल. या आरोपांवर विधानसभेमध्ये मी आजच उत्तर देणार होतो; मात्र सभागृहात सदस्यांची उपस्थिती अल्प असल्याने उत्तर देण्यासाठी दुसर्‍या दिवशी वेळ देण्यात यावी, अशी केलेली विनंती विधानसभेच्या उपाध्यक्षांनी मान्य केली.

सदस्यांची अल्प संख्या असल्यामुळे कामकाज स्थगित !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी ९ मार्च या दिवशी आझाद मैदानावर भाजपच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यासाठी दुपारी १ वाजता भाजपचे सर्व आमदार आझाद मैदानावर गेले होते. त्यामुळे विधानसभेच्या सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता. त्यामुळे थोडे कामकाज झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले. केवळ सदस्यांची अल्प संख्या असल्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आले.