मुंबई – किरीट सोमय्या यांनी पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान यांना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांच्याकडून नील सोमय्या यांच्या आस्थापनाला भूमी मिळवून दिली होती का ?, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकरच सोमय्या पिता-पुत्र कारागृहात जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. सोमय्या यांनी वाधवान यांचा आमच्याशी संबंध नसल्याचे सांगत राऊत यांनी केलेले आरोप फेटाळले.
राऊत पुढे म्हणाले की, सोमय्या यांची वसईमधल्या एका भूमीच्या व्यवहारात वाधवान यांच्यासमवेत भागीदारी आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. जून २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि जीव्हीके आस्थापनाने मुंबई विमानतळाची ६३ एकर भूमी हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एम्.एम्.आर्.डी.मध्ये किरीट सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. ऑक्टोबर २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एम्.एम्.आर्.डी.ला पत्र लिहिले होते. यामध्ये एच्.डी.आय.एल्. आस्थापनाला १ कोटी चौरस फूट व्यावसायिक भूमी बक्षीस म्हणून दिल्याचा आरोप केला होता. या भूमीची किंमत ५ सहस्र कोटी रुपये असल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असेही सोमय्या यांनी म्हटले होते. त्या वेळी सोमय्या खासदार होते; परंतु त्यांनी एकदाही केंद्रीय तपासयंत्रणेकडे तक्रार केली नाही.
(सौजन्य : ABP MAJHA)
वर्ष २०१६ मध्ये सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले. १ डिसेंबर २०१६ या दिवशी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली. निकॉन इन्फ्रास्ट्रक्टरला ५ सहस्र १६८ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकसत करण्याचे अधिकार मिळाले. हे अधिकार राकेश वाधवान यांच्याकडून विकत घेतले होते, असा आरोप राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांचा निकटवर्तीय देवेंद्र लधानी यांच्या साई रिधम आस्थापनाच्या वसईमधील भूमीवर निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला दोन प्रकल्प उभारण्याची अनुमती मिळाली. या भूमीचे मूळ मालक राकेश वाधवान होते. पी.एम्.सी. बँक घोटाळाप्रकरणात किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले असतांनाही त्यांच्या मुलाचे राकेश वाधवान यांच्या आस्थापनाशी संबंध कसे असू शकतात ?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.