भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले !

विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी विधानसभेत पुराव्यांसह दिली माहिती !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी अधिवक्ते यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले होते. त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्यानेही साहाय्य केले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे षड्यंत्र कसे रचले जात होते, त्याचा व्हिडिओ असलेला १ पेनड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला, तसेच त्या पेनड्राईव्हमधील अन्य प्रत्येक व्हिडिओमध्ये कुणाचा काय संवाद आहे, याची सविस्तर माहिती दिली. या व्हिडिओमध्ये कोण कोण संवाद साधत आहेत, हेही त्यांनी सांगितले, तसेच विशेष सरकारी अधिवक्त्याने कारस्थान रचून पुरावे कसे सिद्ध करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची, याची सिद्धता केली होती, असे त्यांनी विस्तृतपणे सभागृहात सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, वर्ष २०२१ मध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद केला. वर्ष २०१८ पासून मराठा शिक्षण मंडळाच्या पाटील गट आणि भोईटे गट यांच्यात संघर्ष आहे. महाजन यांचे स्वीय साहाय्यकाने अपहरण केल्याविषयी बनावट खटला सिद्ध केला. त्या खटल्यात महाजन यांना मोक्का लागला पाहिजे, असे सांगून मोक्का लावण्याची कागदपत्रे सिद्ध केली; मात्र न्यायालयाने महाजन यांना दिलासा दिला.