थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला ! – आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

भ्रष्टाचारामुळे शासकीय आस्थापने डबघाईला आणणार्‍यांवर सरकार कारवाई कधी करणार ? – संपादक 

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – आमची सत्ता असतांना ‘महावितरण’ची तिन्ही आस्थापने नफ्यामध्ये होती. ४२ कोटी रुपयांची थकबाकी असूनही महावितरण नफ्यात होती. थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला आले आहे, अशी टीका भाजपचे आमदार आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना त्यांनी वरील टीका केली.

या वेळी चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, ‘‘वीजदेयकांच्या वसुलीचा ताळमेळ लागत नव्हता; म्हणून आम्ही त्रयस्थ समिती नियुक्त करून त्याविषयीचा अहवाल घेतला. त्यात शेतकर्‍यांच्या नावाने चुकीची देयके दाखवण्यात येत असल्याचे आढळून आले. आम्ही शेतकर्‍यांची वीजजोडणी तोडली नाही. थकबाकीमुळे तोटा होत असल्याचे सांगून महाराष्ट्राची अपकीर्ती करू नका.’’