युद्धामुळे जागतिक अन्न टंचाई आणि धान्याची भाववाढ होणार !

  • ‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्‍या जागतिक आस्थापनाला भीती

  • युरोप आणि आफ्रिकेत धान्य टंचाईचे संकट

प्रातिनिधिक छायाचित्र

कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्न टंचाई निर्माण होणार असून धान्याच्या किमतीत वाढ होण्याची भीती ‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्‍या जागतिक आस्थापनाने व्यक्त केली आहे. ६० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या या आस्थापनाचे प्रमुख स्वीन टोर होलसेथर यांनी ‘बीबीसी’शी बोलतांना ही भीती व्यक्त केली. दुसरीकडे युरोप आणि आफ्रिका येथील देशांना या युद्धाचा फटका बसत असून तेथे धान्य टंचाईचे संकट घोंगावत असल्याचे वृत्त ‘असोसिएटेड प्रेस (एपी)’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसारित केले आहे.

रशिया आणि युक्रेन यांचे धान्यनिर्मितीच्या क्षेत्रात असलेले जागतिक महत्त्व !

  • रशिया आणि युक्रेन हे अन्न अन् अन्य कृषी उत्पादने बनवण्यामध्ये जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
  • युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश हा सुपीक असून तो जगाचा ‘ब्रेडबास्केट’ (उपजीविकेचे माध्यम) म्हणून ओळखला जातो.
  • रशिया आणि युक्रेन हे गहू अन् बाजरी यांचे मोठे निर्यातदार देश आहेत.
  • जगातील गहू आणि बाजरीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात ही या दोन देशांतूनच होते.
  • या दोन्ही देशांचा जगातील एकूण सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत ७५ टक्के वाटा आहे.
  • युक्रेन मक्याचाही प्रमुख पुरवठादार देश आहे.
  • रशिया हा खतासाठी आवश्यक असणार्‍या विविध घटकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो.
  • जगातील अर्धी लोकसंख्या ही खतामुळे निर्माण झालेले अन्न ग्रहण करते. जर खतनिर्मितीवर परिणाम झाला, तर सरळसरळ ५० टक्के अन्न निर्मितीवर संकट येणार आहे, असे मत ‘यारा इंटरनॅशनल’ आस्थापनाचे प्रमुख होलसेथर यांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक घंट्याला स्थिती चिंताजनक होत चालली आहे ! – यारा इंटरनॅशनल

‘यारा इंटरनॅशनल’ आस्थापनाचे प्रमुख होलसेथर

‘यारा इंटरनॅशनल’ आस्थापनाचे प्रमुख होलसेथर म्हणाले की,

१. प्रत्येक घंट्याला स्थिती चिंताजनक होत चालली आहे. उत्तर गोलार्धातील देशांना सध्याचा हंगाम हा धान्यनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असून या कालावधीत मोठ्या प्रमाणात खताची आवश्यकता भासते; परंतु आता येऊ घातलेल्या युद्धामुळे ही स्थिती अधिक बिकट बनत चालली आहे.

२. युरोपमधील अन्न उत्पादनातील साधारण २५ टक्के भाग रशियातील कच्च्या मालावर अवलंबून आहे. त्यामुळे एकूणच जगाने अन्न उत्पादनासाठी रशियावर अवलंबून राहू नये.

३. कोरोना महामारी आणि त्यापूर्वीच्या कालावधीत अन्न उत्पादनावर आधीच अनेक संकटे होती. त्यातच रशिया-युक्रेन युद्ध हे ‘संकटावरील संकट’बनत आहे.

४. गरीब देशांमध्ये अन्न असुरक्षितता निर्माण होण्याची भीती आहे.

५. आधीच गेल्या दोन वर्षांमध्ये जागतिक स्तरावर १० कोटींहून अधिक लोक भुकेले झोपी जात आहेत. त्यामुळे आताचे युद्ध हे अधिक काळजी वाढवणारे आहे.

काय आहे प्रत्यक्ष परिस्थिती ?

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकर्‍यांनी देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. परिणामी जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचसमवेत रशियावर पाश्‍चात्त्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात अल्प होऊन त्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आफ्रिकी देशांनी वर्ष २०२० मध्ये रशियाकडून ४ अब्ज डॉलर (३० सहस्र ८५३ कोटी भारतीय रुपये) मूल्याची कृषी उत्पादने आयात केली होती. यात अनुमाने ९० टक्के गव्हाचा समावेश होता, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या ‘कृषी उद्योग चेंबर’चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ वांडिले सिहलोबो यांनी दिली आहे.

गव्हाच्या किंमती ५५ टक्क्यांनी वाढल्या

युक्रेनवरील आक्रमणाच्या धास्तीने एका आठवड्यापूर्वीच गव्हाच्या किंमती ५५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर युद्ध लांबले, तर युक्रेनमधून होणार्‍या स्वस्त गव्हाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांना जुलैपासून टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे ‘आंतरराष्ट्रीय धान्य परिषदे’चे संचालक अरनॉड पेटीट यांनी ‘एपी’ वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले.

युक्रेनमधून गहू आणि मका पुरवठा यांची निर्यात थांबल्याने अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. इजिप्त आणि लेबनॉन यांसारख्या देशांत गरिबी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे; कारण या देशांतील लोक सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणार्‍या अन्नधान्यावर अवलंबून आहेत.